१.
आहे हुशार तो पण चुकतात डाव त्याचे
फुटतात कोंभ तेथे, बसतात घाव त्याचे
आकाश ठेंगणे अन् भवतालही पुरेना
इतके चढून गेले रात्रीत भाव त्याचे
करतो प्रयास बहु तो नियमात वागण्याचा
घडतो प्रमाद जेथे असतेच नाव त्याचे
मोहात मृगजळाच्या हरवून वाट गेली
आता नसे परतणे चुकले पडाव त्याचे
सोडून पाश सारे पाषाण जाहला तो
तोडून नाळ गेला सुटलेच गाव त्याचे
२.
आसवांनो घ्या विसावा, फार झाले काम आता
उसळणाऱ्या भावनांना द्या जरा आराम आता
भंगली स्वप्ने जरी का पाहते आता नव्याने
कचरले नाही जराही गाळण्याला घाम आता
देवळांची पेठ झाली चालतो व्यापार जेथे
पाहण्या देवास तेथे मोजते मी दाम आता
कोण छोटे कोण मोठे मोजले कोणी कुणाला
मोजण्याला मी स्वतःला लावले आयाम आता
'मी'पणाचा माज केला मानले नाही कुणाचे
श्वास जेव्हा खोल जाई आठवे मग राम आता
३.
घे मनाचा ठाव आता
दे स्वतःला वाव आता
जोवरी असते खुशाली
लोक देती भाव आता
फार झाले लाड त्यांचे
बळ तुझे तू दाव आता
जखम भरली खूण उरली
विसर सारे घाव आता
त्रस्त होता घे विसावा
जवळ आले गाव आता
..............................................

No comments:
Post a Comment