तीन गझला : विजय निकम


 



१.


आत्महत्यांचा पुकारा होत नाही 

आणि कोरा सातबारा होत नाही


केवढी माजोरडी ही राजसत्ता

कास्तकारांचा सहारा होत नाही


कायद्याचे राज्य आहे कागदावर

दंगलींचा गोषवारा होत नाही


वाढली बेरोजगारी या घडीला

नोकऱ्यांचाही चुकारा होत नाही


लोकशाही वाचवाया पाहिजे पण

शोषितांचा एक नारा होत नाही


मित्र एकच सोबतीला ठेव मित्रा

भावनांचा कोंडमारा होत नाही


व्हायचे तर हो स्वतःचा कार्यकर्ता

जीवनाचा मग नगारा होत नाही


२.


जिंदगीचा काढल्यावर गोषवारा शेवटी

फक्त उरतो भावनांचा कोंडमारा शेवटी


भार कर्जाचा बळीच्या वाढतो डोईवरी

मांडतो नावे कुणाच्या सातबारा शेवटी


भूक होती मारलेली लेकरासाठी कुणी

भोगला होता कितीदा पोटमारा शेवटी


काय घोडे मारले या भावकीचे सांग मी

टाकुनी वाळीत हसतो टाकणारा शेवटी


कष्टही आले फळाला नेमके तेव्हा खरे

सोसल्यावर जिंदगीभर ऊन-वारा शेवटी


पाहिली नाहीत स्वप्ने मोठमोठी सारखी

नेमका उडतोय म्हणुनी बोजवारा शेवटी


का तरी सांगू कुणाला दुःख माझे वेगळे

मांडला नाहीच त्याचा मी पसारा शेवटी


३.


मेल्यावरी जगाने केला तपास माझा

जळला शवाबरोबर जीवन-प्रवास माझा


सरली विवंचना अन् मी बेफिकीर झालो 

झालाय मुक्त अवघा अज्ञातवास माझा


यादीमधे मृतांच्या मज शोधता कशाला

आहे जिवंत अजुनी गझलेत श्वास माझा


सोडून मोहमाया झालो निवांत इतुका

लागेलही कदाचित चटका जगास माझा


भेटेल जन्म पुढचा अफवाच शेवटी ही

सपशेल आज ठरला खोटा कयास माझा

..............................................

No comments:

Post a Comment