तीन गझला : छाया बैसाणे





१.


'सावध ऐका पुढल्या हाका'

प्रसंग आला आता बाका


नकोत निष्फळ नुसत्या बाता

दूर भ्रमाला सारे टाका


वेळ जरा द्या अभ्यासाला

परीक्षेत ना बाबा-काका


भलेबुरे ते अता ओळखा

विचित्र दिसता डोळे झाका


विद्येसमान दौलत नाही

घालणार ना कोणी डाका


सत्यासोबत जगणे मरणे

हव्या कशाला आणा भाका


२.


नको पुन्हा तो घाव मनाचा

कळे कुणाला ठाव मनाचा


अबोल असता जाण जरा तू

कळेल तुजला भाव मनाचा


कशास करतो अधांतरी मग

सुनासुना हा गाव मनाचा


किती आर्जवे किती विनवणी

गुन्हा मनाला दाव मनाचा


कधी मनाला कळला नाही

छुपा तुझा हा डाव मनाचा


जगास देतो धडे मनाचे

वेग असा भरधाव मनाचा


अबोल प्रीती कुणास कळली,

हवा कशाला आव मनाचा


३.


मैत्रीचा तू हात पुढे कर,

संवादाचे दार खुले कर


हेवेदावे दोघांमधले

खारिज सारे वाद जुने कर


मैत्री म्हणजे सुगंध सुंदर 

शब्दांचीही जरा फुले कर


आनंदाने जगण्यासाठी

हृदय-मनाचे उंच झुले कर


बांध रेशमी बंध दुज्याशी

अवघे सारे विश्व तुझे कर


कर्तृत्वाचा सुगंध यावा

यासाठी मग कार्य दुजे कर


गाठायाचे ध्येय तुला जर

डोळ्यांमध्ये स्वप्न उभे कर         

..............................................

छाया बैसाणे(सोनवणे)

मो.9284635108



No comments:

Post a Comment