१.
तुझ्या-माझ्यात काही सरमिसळ नाही
म्हणूनच आपले नाते निखळ नाही
नजर ज्याची बघायाची सरळ नाही
समज की तो स्वभावाने नितळ नाही
चिखल झालाय माझा एवढ्यासाठी,
घरी माझ्या मनाजोगे 'कमळ' नाही
उतर खाली तुला उतरायचे तितके
मनाचा डोह माझाही उथळ नाही
जगाला घाल तू, टोप्यावरी टोप्या
तुझ्याइतकी कला माझ्याजवळ नाही
कुसळ दिसणार डोळ्यांतील इतरांच्या
स्वतःच्या आतले केवळ मुसळ नाही
उन्हाची एवढी तक्रार आहे की;
अताशा सावलीचे पाठबळ नाही
तुझ्या प्रेमात पडलो एवढे कविते,
मला दुसऱ्या कशाचीही भुरळ नाही
विसरणे शक्य आहे तर विसर मजला,
तुला विसरायचे, माझ्यात बळ नाही
२.
अश्रू पुसायलाही नाही उसंत आता
होती तशीच आहे डोळ्यांस खंत आता
गालांवरून माझ्या, झरतात रोज अश्रू
इतकाच फक्त आहे, माझा वसंत आता
ज्यांना कधी दिले मी आभाळ पांघराया
ते पाहतात केवळ, माझाच अंत आता
विश्वास ठेवला जर असता तिने जरासा;
झालो मुळीच नसतो मी नाशवंत आता
हाका कुणी कुणाच्या ऐकून घेत आहे?
इतकाच प्रश्न आहे, येथे ज्वलंत आता
खांद्यावरी स्वतःच्या घेऊ कुणाकुणाला?
आहेत वेदना जर, माझ्या अनंत आता
मी कोणत्या दिशेने जाऊ मला कळेना?
माझाच सापडेना मजला दिगंत आता
३.
कसा आहेस तू? साधे मला नाही विचारत.
बरा आहेस की, तू खंगला? नाही विचारत
विनाकारण कशाला दोष द्यावे या जगाला?
इथे जर आपल्याला आपला नाही विचारत
स्वतःचे 'केंद्रस्थानी' पाय माझे रोवतो मी
मला जर वाटले परिघातला नाही विचारत
तिला मी जेवढाही चांगला असतो विचारत
स्वतःला तेवढाही चांगला नाही विचारत
कधीकाळी दिले आभाळ ज्यांना पांघराया
अताशा ते खुशाली की बला?नाही विचारत
स्वतःच्या खिन्नतेला प्रश्न मी इतकाच केला,
मनाचा कोण धागा ताणला, नाही विचारत?
..............................................
No comments:
Post a Comment