तीन गझला : संकेत रवींद्र येरागी

 




१.


बंद असलेली उघडली मी सहज खिडकी

आणि वाऱ्याने अचानक मारली टिचकी


मूळ माझे जीवना सोडू शकत नाही

पाहतो डोळ्यांपुढे पडझड जरी इतकी


आज आनंदात होतो खूप दिवसांनी

आजही आली तुझी बघ आठवण रडकी


वेगळी बाजू जगाची दाखवत आहे

हातुनी निसटू नये केव्हा सवय चिडकी


काढलेले चित्र तू जाऊ नये वाया

रंग भरताना भरत आहे उरी धडकी


वाट एखादी जिथे नेइल तिथे जाऊ

आपली आपण स्वतः घेऊ जरा फिरकी


२.


शांत, आरामात मिटवू वाद दोघांचा

आपल्या दोघात मिटवू वाद दोघांचा


थांबवू भांडण जगाचे कान भरणारे

संयमी धाकात मिटवू वाद दोघांचा


होउ दे मनमोकळे ये पोटभर भांडू

मात्र मग लाडात मिटवू वाद दोघांचा


जर तुला बोलायचे नाही जरासुद्धा

तर कसा मौनात मिटवू वाद दोघांचा


जीवघेणा हा दुरावा सोसवत नाही

हात घे हातात मिटवू वाद दोघांचा


साधतो वादामुळे संवाद वरचेवर

तू नको अजिबात मिटवू वाद दोघांचा 


३.


राहुदे आहे तसे दोघात अंतर

आणते जवळीकता नात्यात जर तर


वाट बघणे आपल्या हातात आहे

धीर धर तू आपला लागेल नंबर


मौन माझे वाच धीराने जरा तू

त्यात प्रश्नाचे तुझ्या दडलेय उत्तर


का स्वतःहुन राहतो चिंतेत कायम

काळजीचा हात जन्मा सोड क्षणभर


फायदा घेणार जग केव्हा तुझाही

तू जगाचा फायदा जर घेतला तर


का करू तुलना स्वतःची मी कुणाशी

भावनांचे सारखे असतात का थर? 


देठ झालो यातही आनंद आहे

जन्मुनी दुनिये बनवले झाड सुंदर

..............…….…..…................

No comments:

Post a Comment