तीन गझला : श्रद्धा खानविलकर

 



१.


क्षणाक्षणाला दृश्यांचा जो रंग वेगळा दिसला 

केवळ जवळुन बघणाऱ्याला त्यात सापळा दिसला


पुन्हा पायरीशी आल्यावर एक प्रचीती आली

मला तुझा गाभारा येथुन फार मोकळा दिसला


उडायच्या आधीच म्हणे आकाश आखले त्याने

पंखांच्या तुलनेने त्याचा विचार दुबळा दिसला 


युद्धाच्या अंती कळले की युद्ध स्वतःशी होते 

ते नेटाने लढणारा हर-एक आंधळा दिसला 


अगदी सहजासहजी अंतर मिटले असते सगळे 

फक्त संशयाचा पुढच्या मार्गात अडथळा दिसला


जगावेगळी धुळवड होती मीरेची, राधेची

तिने निळाई टिपली आणिक हिला सावळा दिसला

 

२.


बघू ओतून आशावाद उरलेला 

रिता दिसणार नाही यामुळे पेला 


भरवसा ठेवला नाही असे नाही 

तरीही वाट सापडलीच शंकेला 


म्हणूया गोड, नियती जी फळे देते

कुठे हातात असतो आपल्या झेला!


कळत होता कुठे परिणाम प्रेमाचा 

चुकीच्या समजुतीने हा गुन्हा केला 


सहन होणार नाही ह्यापुढे काही 

कितीदा पोचलो याही अवस्थेला 


कडी हळुवार इथली काढली कोणी 

विचारांचा थवा कुठच्या कुठे गेला


३.


जगाला वाटते आहे बरे! जे चालले आहे 

मनोरंजन नको त्या पातळीला पोचले आहे


खडा टाकून वलये पाहण्याची हौस नसताना 

मला काठावरी मुद्दाम कोणी आणले आहे


तुला वगळून कायमचा पुढे जाईल हा रस्ता 

इथे थांबायचे त्याचे प्रयोजन संपले आहे  


जशी आहे बरी आहे म्हणावी धाव इथवरची 

सुखाने शेवटी कुंपण तरी ओलांडले आहे! 


कुणाच्या इज्जतीचा प्रश्न होता कोण जाणे की 

अगोदर शुभ्र असणारे अता डागाळले आहे  


कळेना का कसा सध्यातरी गर्दीत आढळतो 

कदाचित फार टोकाचे स्वतःशी बिनसले आहे 


मला नास्तिक म्हणाया लागला आहे कसा जो तो 

असे कोणापुढे जाऊन मस्तक टेकले आहे!

............................................

श्रद्धा खानविलकर, 

ऐरोली - नवी मुंबई

9323455207

No comments:

Post a Comment