१.
उत्तेजना अशी तू देऊ नकोस वाऱ्या
मी पंख कापले बघ, माझ्यात मी स्थिराया
स्वस्तात मागते जी आलू, लसूण, कांदा
तीही तयार नाही अजिबात भाव द्याया
मी हारलो युगात्म्या वस्तीत पांगळ्यांच्या
बसलो उगीच होतो आयुध तुझे विकाया
आयुष्य थोडके अन् गंतव्य लांब आहे
होणार साध्य काही की जाणार जन्म वाया
वाटेवरील काटे सरता सरे सरेना
गंतव्य गाठणे तर ना पंखही उडाया
सत्यापरीस वरचढ झालीय लोभमाया
कोणी तयार नाही सोज्वळ साक्ष द्याया
दिसण्यात कार्य अपुले, दिसतेय सारखे पण
तू धावते पळाया, मी धावतो धराया
जे जे दिसेल ते ते, सारेच प्रिय त्याला
इतरांस सांगतो की, ही व्यर्थ मोहमाया
ओढावयास नांगर कोणीच येत नव्हता
आता सुगीत आला कोकीळ गीत गाया
तोट्यात कास्तकारी? मग अटळ यादवीही
भाऊच भावकीशी लढणार रक्त प्याया
लाचारिचे विषाणू वृत्तीत पोसले तर
प्रत्येक पावलावर लागेल छत्रछाया
लाचार एक झाले, घनघोर बंड केले
घडले असे कधी तर कळवा मला कळाया
काही हशील नाही जागे करून आता
मरणार हे तसेही खंगून जीर्ण काया
तपवून शब्दधारा मग शब्दयज्ञ केला
बघताच शब्दशक्ती जळ लागले जळाया
पाणी दुधात नव्हते, पाण्यात दूध होते
गेली हयात सारी इतकेच उलगडाया
माझे; मलाच; मी; मी! खुंटीस टांगले तर
होईल मार्ग सोपा निरपेक्ष व्यक्त व्हाया
गल्लीत झित्रुबांनो घुसलेत मांसप्रेमी
व्हा सज्ज बैल बांनो लेकीस वाचवाया
चल तोडुयात काही भिंती जुन्या-पुरान्या
तेव्हा मिळेल संधी पाया नवा रचाया
२.
शृंगारल्या मनाला वैश्वीक खाज नाही
भोगत्व सोडले तर, कसलाच माज नाही
निष्णात सैन्य माझे पण हारणार नक्की
मोफत लढावयाचा यांना रिवाज नाही
त्यांच्या कपटनितीला चिरडून टाकतो मी
धर्मास जागणारा मी धर्मराज नाही
खाणार काय घंटा? सोने पितळ कि तांबे?
शेतीमधे उद्या जर पिकले अनाज नाही
गावे बकाल आणिक शहरे सुजून आली
आम्हांस मात्र त्याची अजिबात लाज नाही
शालेय पुस्तकांनी मेंदू बधीर केला
बुद्धी भ्रमिष्टतेवर उरला इलाज नाही
स्वातंत्र्य देवते तू, ये भारतात थोड़ी
जेथे 'अभय' कुणाला कुठलेच आज नाही
३.
हसण्यात जन्म घ्यावा उरकून माणसाने
प्रज्ञा, कला, प्रितीवर भाळून माणसाने
दोन्ही मुठी रिकाम्या घेऊन जन्म-मृत्यू
तृप्तीसवे करावा हनिमून माणसाने
रागिष्ट रागिणीला देऊन सोडचिठ्ठी
शांतीसही बघावे बिलगून माणसाने
माया, तृषा, मनीषा नेईल आडमार्गा
लागू नयेच नादी उमजून माणसाने
करपाश घट्ट द्याया अथवा विलीन व्हाया
सुमतीस वश करावे रिझवून माणसाने
आसक्त कामिनीची छाया पडू न द्यावी
दीप्तीसमेत ज्योती विझवून माणसाने
रति, काम, मोह, मत्सर वरचढ-अभय न व्हावे
मुक्तीकडे निघावे हरखून माणसाने
..............................................

No comments:
Post a Comment