तीन गझला : बालाजी मुंडे

 




१.

आठवणीला तू स्मरल्यावर
काय करू मन गहिवरल्यावर

पुन्हा हुंदका येतो दुसरा
एक हुंदका ओसरल्यावर

किती पुसावे मी अश्रूंना
गालावरती ओघळल्यावर

वाढत गेली आत *पोखळी
मन दुःखाने पोखरल्यावर

अता फुलांचे करू काय मी
फांदीवरती गजबजल्यावर

मला उदासी घेर मारते
फूले फुलल्यावर सुकल्यावर

येते मन गा गलबलून हे
तुला आठवत घर रडल्यावर

कुणास भांडू मी हक्काने
मला भुकेने कुरतडल्यावर

तिथे तुला मी रोज शोधतो
नभी चांदणे चमचमल्यावर

मिळेल थोडा मला दिलासा
कुठे नेमकी तू कळल्यावर

२.

कुणी दाबत, कुणी दबत जगत आले आहे
पूर्वीपासून असेच घडत आले आहे

कुणास ठाउक, कशाचा राग आहे त्यांना
लाटांचे लोण तटास भिडत आले आहे

जमले नाही, चढून वरती जाणे म्हणून;
पाणी उतार बघूनच पळत आले आहे

वावरणारे, भूत अहंकाराचे येथे
सदैव सज्ञानीवरच चढत आले आहे

पटले नाही,सहणे अन्यायाला ज्याला
त्याचेच रक्त पेटून लढत आले आहे

सत्यावरती, आहे ज्याची कायम निष्ठा
मस्तवाल जग त्यालाच छळत आले आहे

पंख छाटणे, सोडत जुल्मी छळवादाचे
माणुस त्याच्या प्रेमात पडत आले आहे

३.

अगा तू सोडते कोठे, तुझे ते वागणे चाबर
कसे बांधून देऊ मी तुला ह्रदयात माझ्या घर?

जसे नगरास देते तू, तसे गावास का नाही?
अम्हा खेड्यास का देते सदा तू वेदना सागर?

मतीला घास पिकव्यांच्या, किती गा त्रास देते तू?
अगा सैराट चालीला कशी ना घालते आवर?

तुझ्या आतील आत्म्याने, तुझा हा पाहता मुखडा
तिथे फासील की नाही तुझ्या थुतरावरी डांबर?

कुणाला सूर्य देते अन् ,कुणा काळोख कायमचा
कुण्या शिखरास नेला तू हरामी वागण्याचा स्तर?

इथे ना हाव आम्हाला, कुणालाही तुझ्याइतकी
तरी देते न खाऊ का अम्हाला आमुची भाकर?

तुझ्या त्या वाकड्या वाटे, जरा का चाललो आम्ही
तुला चाखायला तुप वा सहज मिळणार का साखर?

जरा अखळाय घेना तू, चलाखीला दलालांच्या
खुले का सोडते त्यांना कुणा काबाड कष्टावर?

फुलाइतकाच द्यावा तू, कळीला हक्क जगण्याचा
तसे का पाहते तिरके मुली गर्भात दिसल्यावर?
..............................................
बालाजी मुंडे 'बिंधास्त'
9421363942

No comments:

Post a Comment