१.
आत्मसन्मानास मोठे नित्य आहे मानले
त्यामुळे तर मी कुणाचे पाय नाही चाटले
बोडक्या त्या खोडक्याचे कोंब हिरवे पोपटी
पाहिले अन् त्या क्षणाला दुःख मागे टाकले
आस्तिकांचा नास्तिकांशी वाद होतो सारखा
देव आहे, देव नाही सत्य कोणा गावले
नासका आंबा अढीचा भाग आहे फेकणे
नासवी तो पूर्ण आंबे, ना कुणी जर काढले
भटकले दाही दिशांना मृगजळाला शोधण्या
माणसांच्या काळजातच गोड अमृत लाभले
पुत्रप्राप्ती व्हावयाला घातलेले साकडे
नाव त्याचे पण मुलीच्या कौतुकाने गाजले
सांग रेखा खंत हृदयी वाटते ती कोणती
ही गझल घे व्यक्त व्हाया, अंतरी जे साठले
२.
बंगल्यासाठीच जंगल कापले होते
चित्र त्याचे का उगी मग लावले होते ?
माणसांच्या वागण्याचा अंत लागेना
आठवेना काल जे ते बोलले होते
सत्यवादी राहण्याचे सोसले तोटे
गोड खोटे बोलणारे आपले होते
याचकाला भाकरी तो देत नाही पण
श्वान त्याचे बिस्किटांवर वाढले होते
श्वास अंतिम घ्यायच्या आधी बघितले मी
दुश्मनांचे नेत्रही पाणावले होते
३.
तिच्या फार साड्या कपाटात होत्या
तरी मोलकरणी जुनेरात होत्या
मुलाला चपात्या गरम रोज ताज्या
शिळ्या भाकरी का मुली खात होत्या
भरवसा क्षणाचा नसे माणसाचा
पिढीजात वस्तू महालात होत्या
जरी लावले मी कुलुप त्या घराला
कशी आवरू मन, स्मृती आत होत्या
पुढे ती निघाली, तिला आडवाया
तशा खूप व्यक्ती समाजात होत्या
तिने वाच्यता का कधीही न केली
कहाण्या तुझ्या तर तिला ज्ञात होत्या
जरी लादलेल्या व्यथा वेदना पण
म्हणाली हसत ती, नशीबात होत्या
.....….....................................

No comments:
Post a Comment