१.
मज कुठे न्यायचा घातला घाट आहे
जे मला एवढे सजविल्या जात आहे
जी विषारी पिके पेरली आज त्याची
कापणी जड उद्या खूप जाणार आहे
चेहराही अता आठवेना मुळी तो
जन्म ज्याच्यामुळे जाहला राख आहे
ओरडाही अधी ऐकल्या जात नव्हता
मौन आता सहज ऐकल्या जात आहे
सत्य ऐकायचा मज किती लोभ होता
आरशावर अता केवढा राग आहे
रोज धुंडाळतो नेमकी तीच गाडी
तो कुणाची अशी पाहतो वाट आहे
रास्त हसलाय तू आमच्या मूर्खतेवर
ही तुझी थोरवी आमचे पाप आहे
२.
वेदना भेटीस आली अन् सरळ मी पीत बसलो
गोष्ट परतुन 'ती' निघाली अन् सरळ मी पीत बसलो
भांडलो होतो खरेतर मी तिच्यासाठी परंतू
तीच मज म्हटली मवाली अन् सरळ मी पीत बसलो
आज नव्हती घ्यायची पण संदुका मधली अचानक
ती जुनी चिठ्ठी मिळाली अन् सरळ मी पीत बसलो
मी जिचा हमखास होतो, फोनवर परक्यापरी ती,
" कोण आपण " मज म्हणाली अन् सरळ मी पीत बसलो
घेतली होती विसरण्या पण जरा शुद्धीत येता
आणखी ती याद आली अन् सरळ मी पीत बसलो
फक्त साध्या नोटिशीवर प्रश्न परतुन यायचा ती
काढुनी गेली निकाली अन् सरळ मी पीत बसलो
सांत्वना आडुन जगाने मीठ जखमेच्या मुळावर
चोळुनी पुसली खुशाली अन् सरळ मी पीत बसलो
३.
मुकुटी मढवलेले जसे सारे हिरे अगदी खरे नव्हते
सारे उपेक्षितही तसे सर्रास कांही कोळसे नव्हते
बस यामुळे तेथे मला निश्चिंत इतके राहता आले
टापू मधे त्या दूरवर कोणीच माझे आपले नव्हते
दोघांतला अमुचा खरा मतभेद केवळ एवढा होता
जे भावले होते मला ते जिंदगीला भावले नव्हते
दावा जित्याचा रेटुनी त्यांनीच केला सारखा येथे
आजन्म जे कोणासही जीवित कधीही भासले नव्हते
बस तेच योद्धे नेमके हकदार ठरले शौर्यपदकांचे
ज्यांनी कधी स्वप्नातही शस्त्रास हाती घेतले नव्हते
तेथेच सरतेशेवटी गल्लीत एका सारले जीवन
शहरात ज्या क्षणभर कधी मजला मुळी थांबायचे नव्हते
आश्चर्य आहे आज ते मौनास माझ्या त्रासले सारे
जे काल गोंगाटामुळे माझ्या जराही त्रासले नव्हते
..............................................
No comments:
Post a Comment