१.
करणार काय होतो मीही जगून जीवन
मज वाटले न माझे, माझे असून जीवन
उरला अता न काही संबंध जीवनाशी
आलो मघाच तिजला अर्पण करून जीवन
चोहीकडून बघतो निरखून पण कळेना
दिसते जगास सुंदर कोणीकडून जीवन
माझ्यापरी कुणीही उठले न जीवनातुन
बसली मनात ती अन् गेले उठून जीवन
काढेल प्राण माझ्या देहामधून नंतर
आधी रडेल मृत्यू माझे बघून जीवन
हातामधून माझ्या तू हात काढला अन्
मज वाटले निसटले हातामधून जीवन
२.
दुनिया अशी निघाली
तीही तशी निघाली
माझीच सर्व दुःखे
बेवारशी निघाली
आई जिला समजलो
ती मावशी निघाली
तू वेदना दिलेली
बावनकशी निघाली
मज पूस वादळातुन
नौका कशी निघाली
३.
अता हीच चिंता मला लागली
कधी भेट होइल पुन्हा आपली
जराशीच आली तुझी याद पण
किती आसवे लोचनी साचली
पुन्हा खिन्न झाले सखे आज मन
पुन्हा आज पत्रे तुझी वाचली
जराही तुला जाण नाही, तुझ्या
प्रतीक्षेत ही जिंदगी चालली
किती चांगले आज झाले पहा
किती चांगली माणसे भेटली
..............................................

No comments:
Post a Comment