तीन गझला : सुप्रिया हळबे

 





१.


या मनाला सारखे समजावले आहे

संपले नाते तुझ्या-माझ्यातले आहे


कोरड्या डोळ्यांत हळवी शक्यता व्याली

कोंब इच्छांचे गुलाबी जन्मले आहे


वाढली बागेत वेडीवाकडी झाडे

छाटतो फांद्या तसे मन छाटले आहे


डावपेचांचा चिखल सर्वत्र असताना 

फूल प्रामाणिकपणाचे उमलले आहे


पाखरांची झेप सुद्धा पाहवत नव्हती 

वाढली इतकी मजल की कोंडले आहे


फालतू स्पर्धेस मी कंटाळले आहे

जीवघेण्या लालसेला टाळले आहे


सोबती पाण्यात पाहू लागल्यावरती

मीच मासोळीप्रमाणे पोहले आहे


२.


सूर नात्याचे कशाने बिघडले

तोडले नव्हते तरी तुटले कसे


आरसा मी ठेवला लोकांपुढे

मुखवटे त्यांचे रडाया लागले


मूक प्राण्यांची तिला कळली व्यथा

पोटच्या पोरास का झिडकारले ?


“नेहमी कौतुक करा माझे तुम्ही..!”

या स्वभावानेच सारे नासते


ती तुझ्यासाठीच आहे थांबली  

पण नव्या रस्त्यास तू स्वीकारले


का ? कुणाची पात्रता ठरवायची 

काळ किंवा वेळ देइल उत्तरे


अडचणींनी पाठ नव्हती सोडली

होत गेले दुःख माझे लाडके


मी चुकांना मानते कायम गुरू 

अनुभवांची वाचते मग पुस्तके


कौतुकाचा मोह नाही चांगला

शेवटी निर्माल्य आपण व्हायचे


३.


आनंदाचा पुन्हा गवसला सूर मला

दुःखाने उःशाप दिले भरपूर मला


अपमानाचे घोट रिचवले यासाठी

सन्मानाचे दिसेल पंढरपूर मला


नसेल उरली गरज निरागस नात्याची 

फुटकळ कारण सांगुन केले दूर मला


“कशास रडते..? येईल पुन्हा तो पोटी”

सांगत होता सरणावरचा धूर मला


कुशीत असते मऊ गोधडी आजीची

आठवणींचे सतावते काहूर मला


स्वार्थापोटी प्रेमाचे नाटक रचले

विश्वासाचा दिसला चक्काचूर मला


रस्त्यावरच्या दगडाचे म्हणणे ऐका

“पैशासाठी; या, फासा शेंदूर मला !”

..............................................

1 comment:

  1. तिन्ही गझल अप्रतिम 👌👌❤️❤️

    ReplyDelete