१.
जे मिळे त्याहुनी चांगले पाहिजे,
'आणखी, आणखी' थांबले पाहिजे
तोतया सत्यवादी कुचेष्टा करी
सत्य वेशीवरी टांगले पाहिजे
मरणशय्येवरी जीव आशा धरी
मरण थोडेतरी लांबले पाहिजे
रोज शेजारणीच्या जळो मंजिऱ्या
सौख्य माझ्याघरी नांदले पाहिजे
चूप राहू नये, जाच साहू नये
न्याय मिळण्यातरी भांडले पाहिजे
२.
एका मुठीत सत्ता, एका मुठीत पैसा
हातातली चलाखी करते पटीत पैसा
अर्ध्यामधे पुढारी, पावामधे प्रशासन
कंत्राट देत राही शर्ती-अटीत पैसा
पुजती बनेल बाबा, पुजती बनेल नेता
त्यांच्या खुशामतीने मिळतो लुटीत पैसा
शासक, दलाल, सेठी, भुरटे समाजसेवी
फिरतो क्रमाक्रमाने या चौकटीत पैसा
धंद्यात धर्म जाती बघती उभे बखेडे
दिसतो बराच त्यांना फाटाफुटीत पैसा
३.
अरे हे खायचे नाही, हवे ते प्यायचे नाही
तुला स्वातंत्र्य देऊ पण कुणा बोलायचे नाही
तुला जर गायचे आहे, प्रभूचे गोडवे गा तू
सुरांनी मीठ जखमेवर कधी चोळायचे नाही
पुजाया देवदेवींना निघे तोऱ्यात रखमाई
घरातिल विठ्ठलानेही तिला रोखायचे नाही
नवे ते चौथरे शोधा, बघा त्या तुर्बती कोठे?
अरे तेहतिस कोटींनी पुढे भागायचे नाही
नको जादा करू गुंता तुझ्या पायात दोरीचा
तुला धावायचे आहे, कुठे थांबायचे नाही
..............................................
No comments:
Post a Comment