तीन गझला : अनिल अघम

 




१.


सात मजली हासतो अन्, दुःख हृदयी दाबतो,

वाटते प्रत्यक्ष वेड्या तू मरण बोलावतो


एकदा सांगून ज्याला, शक्य ना समजावणे,

का पुन्हा नादास त्याच्या सारखा तू लागतो?


दोन सांजा भागणे ही, चैन त्याला वाटते,

तो बिचारा यापरी का खूप काही मागतो.


बोलण्या करण्यात ज्याच्या पूर्ण असते स्पष्टता,

मी अशांच्या संगतीला फार किमती मानतो.


त्यास सांभाळून ठेवा रे मनाच्या कोंदणी,

नेहमी शब्दास त्याच्या, जो दिलेल्या जागतो.


२.


शेतकऱ्यांची होते होळी,

व्यापाऱ्यांची लुटते टोळी.


युद्धाचा जो गोंधळ उडता,

चारीकडुनी सुटते गोळी.


सुटून कोणी नको जायला,

विचारपूर्वक बांधा मोळी.


चिंता नेई सरळ स्मशानी, 

चिंतेचा हा जाळा कोळी.


काहींना बस एकच सुचते,

दिसता अडचण, भाजा पोळी.


३.


वेदनेला भोगण्याचे का करावे भांडवल?

आपल्यांना जोडण्याचे का करावे भांडवल?


दुःख झाले काळजाला जाळले त्याने मला,

या मनाला जाळण्याचे का करावे भांडवल?


आपल्यांना पोसण्याचे कार्य केले अल्पसे

तेवढ्याशा पोसण्याचे का करावे भांडवल?


दोष नसता कोणताही हार होती मानली,

कोणत्याही हारण्याचे का करावे भांडवल?


पोळला दुःखात होतो मी कितीदा जीवनी

आज मी त्या पोळण्याचे का करावे भांडवल?

...............................................

No comments:

Post a Comment