१.
खूप बोलू पाहतो, पिंपळाचा वृक्ष हा
सत्य मोठे सांगतो, पिंपळाचा वृक्ष हा
येत कोणी ना पुढे ऊन्हवारे साहण्या
मात्र सारे साहतो पिंपळाचा वृक्ष हा
हाच तो अश्वत्थही, बोधिवृक्षच आणखी
भिन्न नावे वाहतो पिंपळाचा वृक्ष हा
ह्यास हिंदू पूजती, बौद्धही ह्या मानती
एकमेकां बांधतो पिंपळाचा वृक्ष हा
संकटे जो झेलतो, दु:खही जो पेलतो
दृष्ट त्याची काढतो पिंपळाचा वृक्ष हा
काळ येवो चालुनी, काय त्याची काळजी?
अंतरंगी नांदतो पिंपळाचा वृक्ष हा
जाण हे 'अविनाश' रे, मोहमाया संकटे
लीलया ती लांघतो पिंपळाचा वृक्ष हा
२.
उत्साह उत्सवाचा गगनी भरून गेला
पण भक्तिभाव भोळा, हा गुदमरून गेला
गर्दी तशीच वाद्ये, ह्यांचा गजर किती हा
पण तोच कानसेना बहिरा करून गेला
"चालायचे असे हे", म्हणतो खुशाल कोणी
पण एक मात्र नक्की, तो गांगरून गेला
आले सुधारण्याला काही पुढे शहाणे
सल्ला परंतु त्यांचा डोक्यावरून गेला
येथे जमीन सारी नापीक जाहलेली
'अविनाश' पण तरीही ती नांगरून गेला
३.
जन्मास गझल येते, काळीज फाटल्यावर
ती उंच उंच जाते, तळ खोल गाठल्यावर
तंत्रावरीच आता व्हा स्वार एकदाचे
तो मंत्र दूर नाही, आकाश दाटल्यावर
जे जे जगावयाचे, ते ते जगून घ्या रे
मग शब्द लीन होतो, तो अर्थ साठल्यावर
पर्वा मुळी न चित्ता, गेली पळून चिंता
गझले, तुझ्याबरोबर संसार थाटल्यावर
जर जीवनातुनी ह्या केली वजा गझल ही
‘अविनाश’ प्राण त्याचा सोडील खाटल्यावर!
..............................................
डॉ.अविनाश सांगोलेकर
मो.९८५०६१३६०२
No comments:
Post a Comment