तीन गझला : जयवंत वानखडे

 




१.


कुणाशी बोलल्यावाचून मी राहू शकत नाही

तरीपण आतले दुखणे खरे सांगू शकत नाही


लपवताना तिची पत्रे कसोटी लागते माझी

मनाला वाटते तेव्हा कधी वाचू शकत नाही


पहारा नेहमी असतो तिच्यावर कैक डोळ्यांचा 

तिच्याशी बोलतो म्हटले तरी बोलू शकत नाही


स्वतःचे दोष आम्ही मारतो माथी नशीबाच्या

उणीवा आपल्या थोड्या तरी झाकू शकत नाही


मला घेऊन जा देवा विनवते रोज  म्हातारी

घडी आल्याविना यमही तिला नेऊ शकत नाही


नदीचे धावणे हे जीवघेणा शाप नाही का ?

विसावा पाहिजे असला तरी थांबू शकत नाही


शिताफीनेच चढवा चेहऱ्यावर चेहरे खोटे

मनाच्या आरशाला फारसे झाकू शकत नाही


२.


मिळाले ते किती आहे नको पाहूस  आयुष्या

पुढे जाऊ, पुन्हा मागे नको थांबूस आयुष्या


मला चढवून दोरीवर स्वतः झालास डोंबारी

तरी आधार काठ्यांचा नको काढूस आयुष्या


उभा केला गतीरोधक गती मंदावली माझी

मला धावायचे आहे नको रोखूस आयुष्या


चुकीचा मार्ग दाखवला भरवसा तोडला माझा

मला दिसते पुढे दलदल नको ढकलूस आयुष्या


दिले होतेस आश्वासन मला जपणार होता तू

दिल्या वचनात राहा तू नको बदलूस आयुष्या


३.


तुला ना भेटता जाऊ कसा गावात आल्यावर

नको काही मला ओळख तुझ्या दारात आल्यावर


तिचे लाडात येणेही सुखद असते असे नाही 

खिशाला वाटते धास्ती सखी लाडात आल्यावर


घरी येतेस तू माझ्या तसा शेजार कुजबुजतो

नको लावूस दरवाजा सखे तू आत आल्यावर


मला जी येत नाही ती तुला येते सखे जादू

सुटत नाही कधी पैसा तुझ्या हातात आल्यावर


भुकेले पोट, थकलेल्या मनाला लाभते शांती

शिदोरी घेउनी माझी, सखी शेतात आल्यावर

..............................................

जयवंत वानखडे, कोरपना, जि.चंद्रपूर 

मो. ९८२३६४५६५५

No comments:

Post a Comment