१.
आयुष्याची व्याख्या म्हणजे प्रवास केवळ
निसटुन जातो क्षण हातातुन उरते हळहळ
श्वासांवरही कुठे आपला ताबा आहे
अहंपणाचा व्यर्थ वाजवू नकोस संबळ
उगाच नजरानजर जाहली निमित्त झाले
कसे आवरू आठवणींचे उठले मोहळ
बाह्यरूप पाहून कुठे अंदाज लागतो
चाफा मनात रडतो अन् मोहरते बाभळ
आठवणींचे ऊन दिवसभर पोळत असते
असह्य होते पुढे पुढे मग रात्रीची झळ
२.
ओलांडावे कर्तव्याचे माप किती
धाव धावता मनास लागे धाप किती
एकांताच्या मिठीत कोसळतिल अश्रू
काजळ डोळ्यांच्या बांधावर थाप किती
समजुन घेता तुला, स्वतःला दुखावले
कुणास सांगू होतो पश्चाताप किती
मोठेपण वरदान समजुनी मागितले
वरदानाच्या आड मिळाले शाप किती
किती सहज मी वादळ परतवले होते
आठवताना आज उडे थरकाप किती
खंजिर डोळ्यांआड छुपा घेउन फिरतो
आव आणुनी बनतो तो निष्पाप किती
३.
केव्हाच मी सुखाचा केला विचार नाही
दे दुःख जीवना तू, माझा नकार नाही
येतात ओंडके जे पाहून भाळ कोरे
त्यांना न ओळखावे इतकी हुशार नाही?
पाऊस बारमाही आहे तुझ्या स्मृतींचा
पण वाटणीस माझ्या आले शिवार नाही
माझ्यात वैद्य माझा उपचार मीच आहे
माझ्याशिवाय मजला दुसरा विकार नाही
साहून लाख जखमा निर्ढावले अशी की
फुंकर अता जराही मज भासणार नाही
पाहून घेउ दे मज डोळे भरून आई
माहेर सोडल्यावर मन लागणार नाही
...…........................................

No comments:
Post a Comment