१.
आतून चाललेला संगम कुणाकुणाचा
समजून घे इशारा मोघम कुणाकुणाचा
ह्या बुडबुड्यास वेडा अजुनी खरे समजतो
फिटता फिटत नसावा संभ्रम कुणाकुणाचा
हेही 'बरे'च म्हणतो तेही 'बरे'च म्हणतो
केव्हाच स्टँड नसतो कायम कुणाकुणाचा
डावा कधी अचानक उजवा बनून जातो
असतो असाच रस्ता मध्यम कुणाकुणाचा
प्रत्येक घुंगराच्या भाग्यात सूर नसतो
आवाज होत नाही छमछम कुणाकुणाचा
कविता रुसून बसते , रुसते कधी गझलही
जेव्हा भयाण छळतो विभ्रम कुणाकुणाचा
दर्शन तिचे असेही जादूसमान होते
बदलायचा अचानक मौसम कुणाकुणाचा
येता जवळ इलेक्शन फुटते मुक्यास वाचा
हमखास वाजतो मग पडघम कुणाकुणाचा
पाहून चेहरा तू ठरवू नकोस काही
तू जाणतोस कोठे दमखम कुणाकुणाचा
२.
पुन्हा आठवांची त्सुनामी नको
नको ना पुन्हा ती कहाणी नको
विषारी बिया पेरल्या जर इथे
फळे मग तुला का विषारी नको?
तुझे मौन होते पुरेसे मला
कशाचीच आता सफाई नको
भले तू स्वतःला समिक्षक म्हणव
मला तर तुझी वाहवाही नको
बहर पाहुनी बोलले सर्वजण
कुणाला अशी आमराई नको
अपेक्षा मुलीची निरागस किती
मुलाच्या जवळ बापआई नको
मला एकदाचा असा भेट तू
परत भेटण्याची तृषाही नको
३.
कळेना खंत ही मांडू कशी कोणाकडे माझी
निशाणी एकही नाही अता गावाकडे माझी
खरे कारण असे होते जवळचे दूर जाण्याचे
फिरवली पाठ नाही मी कधी सत्याकडे माझी
कधी तर शांततेचा क्षण जरा वाट्यास येऊ दे
इलूशी आस होती धावत्या काळाकडे माझी
करपले बालपण सारे अपेक्षांच्या दबावाने
वसूली राहिली आहे किती काळाकडे माझी
किती उन्मत्त होऊनी बुडवण्या लाट आलेली
तरी मी आणली होडी पुन्हा काठाकडे माझी
तुझ्या यादीमधे माझा असावा टॉपचा नंबर
अशीही मागणी होती कधी देवाकडे माझी
...............................................
No comments:
Post a Comment