१.
जगास सावली मिळो म्हणुन उभी उन्हात मी
रुतेन बीज होउनी सदा मुळामुळात मी
नकोय आरसा पुढे दिसेन मी तरी मला
मिटून पापण्या जरा बघेन अंतरात मी
सुखा जरा कधीतरी चुकून अंगणात ये
धरून हात मग तुझा भिजेन पावसात मी
तयार जर असाल तर पुन्हा असेच सांगते
सुरेल गीत गाउनी रमेन या जगात मी
असेल एवढी ढगात ओल येत जर पुन्हा
हळूच ओल होउनी लपेन बघ ढगात मी
२.
कित्येक दु:खांनी मला तर स्पर्श केले बोचरे
गेले करत मी नेहमी हातातले क्षण साजरे
हृदयात जागा घेतली कोणी कळेना नेमकी
पळ काढला माझ्या व्यथेने एवढे आहे खरे
कित्येक वेळा हात त्याचा घेतला हातात मी
नस नेमकी पण आजवर कळलीच नाही का बरे
माळीन म्हणते चांदण्या केसांत माझ्या रोज मी
पडदे ढगांचे दूर जर करशील थोडे लाजरे
सांभाळ तू पात्रात जाताना नदीच्या तेवढे
कळणार नाहित खेचणारे खोलवरचे भोवरे
३.
किती धर्मांधतेचा चालतो संचार आता
पिटाळा या विषाणूला जगाच्या पार आता
निरंतर पेरणी केली मनाने एवढी की
उगवले पीक येथे कामनांचे फार आता
तिच्या पंखातले बळ वाढले आहे अताशा
नका घालू खुजे होऊन इतके वार आता
छुपे केलेस हल्ले सांग का माझ्या मनावर
कशाला एवढे मानायचे उपकार आता
मनाच्या आत दडलेले विकारी अंश सारे
किती पाहून ते ओशाळला अंधार आता
..............................................
तिन्ही गझल अप्रतिम ❤️
ReplyDelete