तीन गझला : अरुण विघ्ने

 




१.


माणूस पाहतो जर बुद्धात माणसाला

माणूस भेटतो मग धम्मात माणसाला


नावास बौद्ध होणे, भीमास मान्य नाही

लोह्यासमान तपवा कर्मात माणसाला


येईल भाट कोणी काशाय वस्त्रधारी

पण पारखून घ्यावे संघात माणसाला


जगणे उपासकांचे धम्मापरी असावे

तो ठेवणार नाही दु:खात माणसाला


जीवन खुशाल होते संवाद साधल्याने

बसणे उचीत नाही मौनात माणसाला


माणूसकी निघाली शोधात माणसाच्या

परखून घेत आहे जगण्यात माणसाला


२.


शोधात भाकरीच्या अवघा प्रवास झाला

तेव्हा कुठे जरासा माझा विकास झाला


मी मोडलो कितीदा पण वाकलोच नाही

त्याचा जरी मनाला भलताच त्रास झाला


नव्हते कुणीच माझ्या दु:खात सोबतीला

संदेश गौतमाचा जगण्यास श्वास झाला


माझ्यात शिक्षणाने झाला बदल पुरेसा

माणूस आज झालो आचार खास झाला


वाड्यात काल माझ्या वर्दळ बरीच होती

पक्षी उडून गेले वाडा भकास झाला


सांगा कुणास द्यावा नुसताच दोष येथे

होते समान सारे मजलाच भास झाला


३.


आला बराच होता तोट्यात सातबारा

लटकून काल गेला फासात सातबारा


नियमानुसार जर का मालास भाव असता 

बुडला कधीच नसता कर्जात सातबारा


केली न कर्जमाफी येथील शासनाने

पडला गहाण माझा स्वस्तात सातबारा


शेतात जात नाही ती सून सासरी जर

अडसर हवा कशाला लग्नात सातबारा


भाऊ हयात नाही अन् मायबाप गेले

पडला पडीक आता गावात सातबारा


खर्चात वावराच्या सोने गहाण पडले

दुष्काळ-सावटाने गोत्यात सातबारा

.......…................…................

अरुण विघ्ने 

मो.८३२९०८८६४५

No comments:

Post a Comment