तीन गझला : ज्योती शिंदे

 




१.


प्रेम जडले तर कुणाचे काय जाते?

आणि टिकले तर कुणाचे काय जाते?


एकदा चोरून त्याने पाहिले अन्

गोड हसले तर कुणाचे काय जाते?


बरसतो पाऊस जेव्हा ओसरीवर

त्यात भिजले तर कुणाचे काय जाते?


फक्त नजरेचीच भाषा चाललेली

ओठ मिटले तर कुणाचे काय जाते?


ही नशा आहेच प्रेमाची विलक्षण

मी बहकले तर कुणाचे काय जाते?


या मनाची त्या मनाला साद गेली

सूर जुळले तर कुणाचे काय जाते?


ईश्वराची भेट आहे प्रेम म्हणजे

त्यास पुजले तर कुणाचे काय जाते?


२.


धावत्या सावल्या कुठे गेल्या

बोलक्या सावल्या कुठे गेल्या


थांबलेल्या घराजवळ माझ्या 

मूक त्या सावल्या कुठे गेल्या 


झोप डोळ्यांमधे अनावरशी

भासत्या सावल्या कुठे गेल्या 


जीव झालाय घाबरा माझा 

कोंडत्या सावल्या कुठे गेल्या


शोध मी घ्यायचा कुठे आता 

नेमक्या सावल्या कुठे गेल्या 


राबले जन्मभर घरासाठी 

पांगत्या सावल्या कुठे गेल्या 


बालपण हरवले जिथे माझे

रांगत्या सावल्या कुठे गेल्या 


३.


चित्रात रंग भरले माझ्या मनाप्रमाणे

पानाफुलांत रमले माझ्या मनाप्रमाणे


बरसून आज गेला पाऊस आठवांचा

ओल्या ऋतूत भिजले माझ्या मनाप्रमाणे


सरकून सावल्या त्या गेल्या कुठे कळेना

आयुष्य हे बदलले माझ्या मनाप्रमाणे


कोणी न सोबतीला येणार शेवटाला

मी एकटीच फुलले माझ्या मनाप्रमाणे


गझले तुझ्याचसाठी आयुष्य वेचले मी

शब्दांत या मिसळले माझ्या मनाप्रमाणे


अस्तास सूर्य जाता अंधारल्या दिशाही

ज्योतीसवे उजळले माझ्या मनाप्रमाणे

..............................................

ज्योती परशुराम शिंदे

मो. ९८५०२०३८६८

No comments:

Post a Comment