तीन गझला : विश्वास कुलकर्णी

 




१.


मी जगाया लागल्यावर ती जळाया लागली 

यारहो तेव्हा कुठे दुनिया कळाया लागली 


सोबती होती म्हणे जी सावली माझ्यासवे 

ऊन थोडे वाढले की डळमळाया लागली 


तो विमा काढेल तेव्हा द्यायची खात्री कशी 

पावसाने ही पिके जर ढासळाया लागली 


उचलतो आहेस हल्ली येथले तारे किती 

चांदण्यांची वाट का रे काजळाया लागली ?


माय माझी, बाप माझा वाद हा भावांमधे 

गोष्ट ही स्वप्नात आता आढळाया लागली 


भोगतो आहेस तूही विठ्ठला अमुच्यासवे 

तुळस दारातील बघ ना सावळाया लागली 


एक डुबकी आणि पापातून मुक्ती लाभते 

मग कशाला मी बघू गंगा मळाया लागली


२.


कुणीतरी बोलून बघा ना माझ्याबद्दल 

तिला नेमके काय वाटते याच्याबद्दल 


ती येते की मी जातो हा प्रश्नच नाही 

उत्सुकता आहे ती आहे प्रेमाबद्दल 


तिचे मौन शब्दांत वेचता आले तर मग 

आदर नक्की वाटू शकतो शब्दाबद्दल 


भेटीमध्ये स्पर्श जरासा हवाच ना रे 

फक्त असावी ओढ तिलाही स्पर्शाबद्दल 


हात तिचा हातात घ्यायचा म्हणजे गंमत 

प्रेम अता वाटेल छानसे जगण्याबद्दल 


म्हणे मिठीही अवघड असते... सोपी नाही 

अनुभवल्यावर बोलू शकतो त्याच्याबद्दल   


नको लगेचच ओठांवरती साखर पेरू 

शंका आहे... धीर व्हायचा का याबद्दल 


किती विलक्षण असते ना प्रेमातील जादू 

कुतूहल जागवते एकेका टप्प्याबद्दल


३.


त्याच गोष्टी सांगते आजी नव्याने 

काळ होतो बाळ, तेही कौतुकाने 


होय, देवाच्या शिरी शोभेल ते पण 

निवडला गजराच आहे मोगऱ्याने 


खूप रडल्यावर मला हा प्रश्न पडला 

काय मिळते आसवांना वाहिल्याने ?


पूल दुःखाचा नको जोडू कुणाशी 

दुःख हलके होत नाही वाटल्याने 


पुस्तके वाचून मिळते ज्ञान नक्की 

जाण येते माणसांना वाचल्याने

..............................................

No comments:

Post a Comment