१.
जन्मच अपुला झाला आहे सरणावरती जळण्यासाठी
पण घालवतो जीवन वाया फक्त एवढे कळण्यासाठी
रोज सकाळी सूर्य उगवतो नित्यनेम हा कधी न चुकतो
वाटचाल दिवसाची करतो सायंकाळी ढळण्यासाठी
वसंत येता जादू होते पान-फुलांनी झाड बहरते
पान-पान पण तयार असते शिशिरामध्ये गळण्यासाठी
तहान अपुली भागत असते पिऊन माठामधले पाणी
कुंभाराचे कष्ट बघा हो त्या मातीला मळण्यासाठी
आळस जर का केला नसता हरला नसता ससा कधीही
ऊठ 'दिवाकर' तयार हो तू स्पर्धेमध्ये पळण्यासाठी
२.
कशास पुसता अता खुशाली
नसे आसरा, कुणी न वाली
घडे चौकशी नावापुरती
नकाच वाहू उगा पखाली
विषय बघा ह्यांच्या चर्चेचे
कुत्री गाभण, मांजर व्याली
दोष कसा द्यावा नशिबाला ?
जीवन हे त्याच्याच हवाली
औषधात तर सोडा यारो
तेथेही खातात दलाली
सावधानता पाळा आता
मर्कटहाती नको मशाली
विकासकामे करा परंतू
नका वाढवू इथे बकाली
चला अता कामाला लागू
पूर्वे दिशेला आली लाली
गजर सारखा ऐकू येतो
वारी प्रस्थानास निघाली
३.
आयुष्याचे कोडे थोडे सुटले होते
लोक जिवावर जेव्हा माझ्या उठले होते
दाहकता या सरणापेक्षा त्यांची होती
जिवंत असता ज्यांनी मजला लुटले होते
कौतुक साधे कधीच कोणी केले नाही
साधा आणिक भला असे पुटपुटले होते
मज भेटाया येणाऱ्यांची गर्दी झाली
कुणास ठाउक लोक तरी कुठकुठले होते
शोध अता मी घेतो आहे त्याच क्षणांचा
'दिवाकराचे' नशीब जेव्हा फुटले होते
...............................................
दिवाकर चौकेकर,
गांधीनगर (गुजरात)
No comments:
Post a Comment