१.
आत माझ्या चेहऱ्याला लावलेला चेहरा
अंतरीच्या वेदनेने भारलेला चेहरा
मी विचारी भूतकाळा,का स्वतःला जाळले
त्याचवेळी वर्तमानी जन्मलेला चेहरा
का रिकाम्या जाणिवांचा वाढला गोतावळा
शून्य प्रहरी भावनांनी गाळलेला चेहरा
मी स्मृतींच्या कागदावर रंग काळा फासता
वर्तमानाशी तरीही भांडलेला चेहरा
भोवताली दुःख सारे सोसताना हासता
वेदनेची अतिहुशारी राखलेला चेहरा
२.
जिंदगी माझी विराणी गात आली
कोणती तगमग मनाच्या आत आली
माणसाचा शोध मी घेण्या निघालो
आड माझी नेमकी का जात आली ?
मी उजेडाची अपेक्षा का करावी
भेटण्याला जर गुलाबी रात आली
नापिकीने झोप माझी उडवली अन्
का तुझ्या डोळ्यांत ही बरसात आली
वेदना विसरून गेलो आपसूकच
अंगणी नाचतच जेव्हा नात आली
३.
ऐनवेळी श्रावणातच, आटतो हा पावसाळा
पंख माझ्या या पिकांचे, छाटतो हा पावसाळा
पान हिरवे, रान हिरवे, शेत हिरवे बहरले की
ओलसर संसार न्यारा, थाटतो हा पावसाळा
दूर आकाशात हसते, वीज ती वेड्यापरी अन्
रोमरोमी माझिया मग, दाटतो हा पावसाळा
कारणे सांगून वेड्या, येत नाही भेटण्याला
प्रेमवेड्या प्रेमिकेसम, वाटतो हा पावसाळा
लाजलज्जा सोडुनी जर वागला वेड्याप्रमाणे
मायबापाच्या मुखी मग बाटतो हा पावसाळा
...............................................
No comments:
Post a Comment