तीन गझला : राना दौड

 



१.


कर्ज कुठे फिटते या जन्माचेही मरणानंतर

कर्मासोबत येते पुढचा जन्म भेटल्यानंतर


झाला आहे कागद ओला माझ्या आयुष्याचा

लिहिता आले न पेटले शब्द तुझ्या प्रेमानंतर


कोणाची शिक्षा नको कुणाला म्हणून सावरलो

नाव काढले तिचे पुन्हा नाही मी लग्नानंतर.


दु:खाची पण अनुकंपा असते कुठे कुणावरही.

मीच घावलो गिर्‍हाईक हक्काचे माझ्यानंतर                 


अटी मानल्या बिनशर्त अता सार्‍या मी नशिबाच्या

नकार नाही दिला रिकाम्या हाती आल्यानंतर


२.


हुंकार ऐकला मी अंतस्थ नेणिवांचा

मंजूळ फक्त नसतो आवाज गायकांचा


गेली निघून तेव्हा नाही नजर मिळवली

मग घेत राहिलो मी अंदाज पावलांचा


बिनधास्त लेक फिरते सोबत जनावरांच्या

उरला तिलाच नाही विश्वास माणसांचा


आहे विहीर भरली डोळ्यांत वेदनेची

ना पण कधी भरवला बाजार आसवांचा


जागत कशा करीता असतील रातभर त्या

का जीव जाळतो इतका चंद्र चांदण्यांचा


३.


सांभाळ तुझा तू श्रावण अन् उंच झुला

पसंत आहे ग्रिष्माची पानगळ मला


काय एवढी घाई होण्या विभक्त अन्

शिकलीस कुठे नाते तोडायची कला


एक अपेक्षा घेउन डुबते प्रेमाला

तू पण माझी की मीच तुझा प्रश्न खुला


क्षणच लागतो निरोप घेण्या दुनियेचा

गर्व केवढा माणुस होण्या त्यास भला


संदर्भ अजब आहे शहरासही तुझ्या

जातोय मुका बहिर्‍याला बोलवायला


ती निघून गेली मग कळले जग मजला

मी खुशाल जग माझे समजायचो तिला


तुझी पोकळी भरणार कधीही नव्हती

दिवा आठवांचा उगाच जळत राहिला

..........................................

No comments:

Post a Comment