१.
निशाणी जाळली, काही नवे झाले असे नाही
सुखाला भाळली, काही नवे झाले असे नाही
तिचा तो वार नजरेचा कसा जाईल रे खाली
जखम गंधाळली, काही नवे झाले असे नाही
फुलांनी टाकल्या माना शहर सजवायच्या आधी
पुन्हा चुरगाळली, काही नवे झाले असे नाही
बहूधा एकटी आहे तिची मैफील सुनी आहे
नजर कवटाळली, काही नवे झाले असे नाही
अलिंगन रोज देताना किनारा तो वजा झाला
नदी फेसाळली, काही नवे झाले असे नाही
तिलाही मोहणी पडली पुन्हा पहिल्याच प्रेमाची
जरा चेकाळली, काही नवे झाले असे नाही
२.
होते मनात जे ते घडणार आज बहुधा
दर्पण पुन्हा नव्याने हसणार आज बहुधा
ती जागणार आहे ही रात गारव्याची
चंद्रात गोडवाही असणार आज बहुधा
झाला खरा सुगंधी सारा शिवार आता,
कमळात एक भुंगा फसणार आज बहुधा
घालून मान खाली केला तिने इशारा,
तारा अनायसे तो तुटणार आज बहुधा
जड पापणीस झाली ही आसवे सुखाची
पाऊस सांजवेळी पडणार आज बहुधा
तळ सोडला लगोलग आले उठून मोती
ती सागरा किनारी बसणार आज बहुधा
..............................................

No comments:
Post a Comment