तीन गझला : अल्पना देशमुख-नायक






१.


त्याला नाही मरणाचे भय

तुझे नि माझे नाते अक्षय


तू माझ्या असण्याचे कारण

तू माझ्या जगण्याचा आशय


ओझे वाढत जाते नंतर 

जर दुःखाचा केला संचय


तू सोबत आहेस नेहमी 

म्हणून जगता येते निर्भय


एकाकीपण शाश्वत आहे

सांगत असते ढळणारे वय


या जन्मीची ओळख नाही

जुनाच आहे अपुला परिचय


तुला जिंकता आले नाही

हा आहे माझाच पराजय


सोंग सुखाचे घेतलेस तू

तुला चांगला जमतो अभिनय


२.


दुःख, तगमग, घाव, अश्रू, वेदना देतेस तू

रंग दरवेळी मनाला नवनवा देतेस तू


कोणत्या वेडात आम्ही धावतो आयुष्यभर? 

ध्यास अमुच्या पावलांना कोणता देतेस तू

 

रोज आकाशात दिसतो अन् कधी स्वप्नातही 

पण कुणाला तो सुखाचा चांदवा देतेस तू?


आजही रेंगाळले मी दोन क्षण दारी तुझ्या

ऐकले होते असे की आसरा देतेस तू


ज्या क्षणी, जेथे मनाचा तोल जाऊ पाहतो

सावराया हात तेथे आपला देतेस तू


तेवढी प्रेमात पडते वाचते जितके तुला 

अर्थ दरवेळी स्वतःचा वेगळा देतेस तू?


व्हायचे नाही कधीही यापुढे बेघर मला 

पाहिजे हृदयात जागा सांग ना देतेस तू?


३.


हृदयामध्ये काही रुजते आहे 

अन् अश्रूंना कविता सुचते आहे


उत्सुकतेने दुनिया बघते आहे 

कळी कोवळी हळू उमलते आहे 


ज्यावर छोटे घरटे विणले होते 

तीच नेमकी फांदी सुकते आहे


हसतमुखाने दिवस पार केल्यावर

रात्र एकटी... डोळे टिपते आहे


मुरड घालते नाजुकशी इच्छेला

ती आताशा जगणे शिकते आहे


शब्दांना जे गूढ उमगले नाही

मौनाला ते उत्तर मिळते आहे


ऐकत आहे तुझे बोलणे म्हणजे 

प्राजक्ताचा सडा वेचते आहे


सळसळेल मग पुन्हा नव्या ऊर्जेने 

जग वेगाने कात टाकते आहे

...............................................

No comments:

Post a Comment