१.
देतोस हातचे तू राखून सर्व काही
मिळते कुठे कुणाला मागून सर्व काही
हे काय रे सततचा तू फोनकॉलवरती
बोलू मलाच म्हणतो भेटून सर्व काही
निर्णय हवा तसा तू घेऊन टाक दुनिये
मी जिंकले तसेही हारून सर्व काही
वेळेवरीच मेंदू जातो कुठे चराया
चुकतो धडे सततचे गिरवून सर्व काही
साऱ्याच तीर्थयात्रा झाल्यावरी कळाले
सुक्ष्मातिसुक्ष्म तू तर व्यापून सर्व काही
तू भेटला अचानक वस्तीमधे उन्हाच्या
हरखून जीव गेला पाहून सर्व काही
जवळी तुझ्याच करते मी मोकळे मनाला
तू बोलतोस कायम तोलून सर्व काही
इतकीच साथ जन्मा चल बाय बाय टाटा
मी चालले खुशीने सोडून सर्व काही
२.
विसरून धर्मभाषा वय जातपात वारी
तोडून पाश येते पंढरपुरात वारी
स्मरुनी तुला निरंतर करते मनात वारी
घडते मला अशी ही देवा क्षणात वारी
तू शिस्त लाव सारी बेशिस्त त्या नभाला
होते स्थलांतराची उनपावसात वारी
गेले कधीच नाही चालून ग्रंथदिंडी
उचलून रोज भारा करते उन्हात वारी
आईत रुक्मिणी मज बापात देव दिसतो
सेवा करून त्यांची घडते घरात वारी
गेल्यावरी कशी अन् करणार कोण कामे ?
ऐकून प्रश्न अडते का उंबऱ्यात वारी
भाकर तव्यावरी अन् आभास विठ्ठलाचा
करते अभंग-ओव्या मी गात गात वारी
घामावरी धुळीचा उडतो गुलाल बुक्का
आजन्म भावनेची या वावरात वारी
आहे करायचे तर इतकेच विठ्ठला कर
पाठव लिहून माझ्या तू प्राक्तनात वारी
माणूस जन्म घ्यावा अन् सार्थकात जावा
व्हावी अशी प्रियाची हर जीवनात वारी
देहाकडून निघुनी आत्म्यात पोहचावी
बस एकदा घडावी ही अंतरात वारी
३.
भुलवायचा जगाला बाहेरचा उजाळा
होता जिच्या मनाचा उध्वस्त पोटमाळा
महिनाअखेर माझा दिसतो खिसा रिकामा
करते हिशोब मी पण चुकतोच ठोकताळा
लाखोंमधून येते हातात एक दमडी
अनुदान योजनेचा उडतो असा धुराळा
करतेस चिंब ओले देऊन पावसाळा
वाटून दे तुझाही आई कधी उन्हाळा
देणार हात नाही तुजला कुणीच येथे
का वेदने निघाली शोधायला जिव्हाळा
अश्रू पुसून घे तू अपुल्याच मनगटाने
आलाच सांजवेळी दाटून जर उमाळा
नाही महत्त्व जेथे वय, जात दाखल्याला
मी काढणार ऐसी दुनियेत एक शाळा
हिणवू कसे फळ्याला रंगावरून त्याच्या
उज्ज्वल भविष्य करतो जर तोच रंग काळा
भांडून रोज अमुचे उदयास प्रेम येते
माझ्या-तुझ्या प्रितीचा अंदाज हा निराळा
..............................................
No comments:
Post a Comment