तीन गझला : एजाज़ शेख

 




१.


उधळायला कुठे पण आयुष्य लागते?

वेचावयास कणकण आयुष्य लागते 


इमले रचून सुंदर घर बांधशील तू

कळण्यास मात्र घरपण आयुष्य लागते


एका क्षणात होतो हा रंक राव पण

होण्यास एक दर्पण आयुष्य लागते


ही चूल जीवनाची विझते क्षणामधे

आणावयास सरपण आयुष्य लागते


डोळ्यांत आसवांना जागा दिलीस का?

समजावयास कारण आयुष्य लागते 


प्रत्येक श्वास म्हणजे लढणे स्वतःसवे

जिंकावयास हे रण आयुष्य लागते 


उंची कळून येते एका क्षणात पण

समजायला खुजेपण आयुष्य लागते


जखमा तुझ्या कदाचित जातीलही भरुन

मिटण्यास हे तुझे व्रण आयुष्य लागते


माझ्यामधील माणुस मरताक्षणी म्हणे

संपावयास 'मी'पण आयुष्य लागते 


उधळून नीळ बाबा मी मिरवतोय पण 

समजायला निळेपण आयुष्य लागते 


२.


अचानक दाटले डोळ्यांत पाणी खूप दिवसांनी

मुलीच्या ठेवुनी हातात नाणी खूप दिवसांनी 


कदाचित काम आहे वाटते माझ्याकडे त्यांना 

विचारू लागले तब्येत-पाणी खूप दिवसांनी


जिथे रडतो तिथे रडते जिथे हसतो तिथे हसते 

व्यथा बहुतेक ही झाली शहाणी खूप दिवसांनी


हृदय हलके करावे वाटते आहे ढगासोबत

चला मग ऐकुया पाऊसगाणी खूप दिवसांनी 


मनाचे घाव भरले पण तरी काहीतरी होते 

तुझी मी आठवत आहे निशाणी खूप दिवसांनी 


तुझे माणूसपण समजायला इतकेच मी केले 

लिहाया घेतली माझी कहाणी खूप दिवसांनी 


३.


संशयाचा मांडला बाजार मौनाने

बाद केले सर्व शिष्टाचार मौनाने


दाबल्या गेल्यात किंकाळ्या मनामधल्या

लावले आहे मनाचे दार मौनाने


हासतो मी ह्या जगाच्या गैरसमजावर

'खूपदा केले मला लाचार मौनाने'


दोन मिनिटांची दिली श्रद्धांजली त्यांनी 

अन् चढवले आसवांचे हार मौनाने


क्षणभरासाठी स्वतःचे एकटेपण जग

चांगला येइल तुला आकार मौनाने 


काय मी करणार जर कळले तुला नाही 

मी दिला होता तुला होकार मौनाने


पावलावर पावले टाकीन बुद्धाच्या 

सोडले केव्हाच मी हत्यार मौनाने


एक छोटेसे हसू, हलका करत आहे 

काळजावर टाकलेला भार मौनाने


एकटे सोडून जग एजाजला गेले 

पण दिला आयुष्यभर आधार मौनाने

.............................................

No comments:

Post a Comment