१.
किनारे, चंद्र, तारे, नभ, नद्या, ढग दाखवत असतो.
मुलीला मी घरी चित्रांमधे जग दाखवत असतो.
दिखाव्याची कितींना लागते धग दाखवत असतो.
इथे प्रत्येक मांडव फक्त झगमग दाखवत असतो.
असा दररोज सांजेला, पुढे ढग धावतो माझ्या,
मला कोणी जणू माझीच लगबग दाखवत असतो.
तुम्ही ओळींमधे बसता, उगाचच राबता शोधत,
कवी तर दोन ओळींतील तगमग दाखवत असतो.
बियाण्यातील दाणा एकदा 'मातीत जातो' पण,
पुन्हा उगवून तो मातीसही रग दाखवत असतो.
जगालेखी तुझी गिनती नको शत्रूंमधे माझ्या,
तुला मी एवढ्यासाठीच जिवलग दाखवत असतो.
२.
सांगतो पूर आकाशवाणी नदीला.
या हिवाळ्यात नसणार पाणी नदीला.
नागमोडी गळा त्यात ओवून गावे,
ही कुणी घातली एकदाणी नदीला.
भेटल्यासारख्या वाटल्या मायलेकी,
ही नदी भेटली ज्या ठिकाणी नदीला.
एक म्हातारपण रोज रडते नदीवर,
सांगते रोज जीवनकहाणी नदीला
आडवाटेतही जन्म ठेवा प्रवाही,
फक्त जीवन कळाले अडाणी नदीला.
ही नदी वाटते का तिला दानपेटी?
माय का देत असणार नाणी नदीला ?
३.
ही एक गोष्ट देवा तू चांगली दिली.
सर्वांस एक दुनिया आपापली दिली.
मयतीत फोन माझा मी बंद ठेवला.
एका नव्या तऱ्हेने श्रद्धांजली दिली.
आले परिस्थितीने पायात घुंगरू.
फेकून तोरडी मग, पायांतली दिली.
देऊ कशी तिच्या मी डोळ्यांत आसवे?
स्वप्ने जिने स्वतःच्या डोळ्यांतली दिली.
होत्या मुळात सगळ्या बोन्साय योजना
नव्हती फळे निपजली ना सावली दिली.
..............................................
गोपाल मापारी
मो.9423484829

No comments:
Post a Comment