१.
काळ करतो कदर शेवटी शेवटी
सत्य होते प्रखर शेवटी शेवटी
लागते ठेच पायास कित्येकदा
वाट होते सुकर शेवटी शेवटी
जन्मभर छापली बातमी ना कुणी
कौतुकाचे सदर शेवटी शेवटी
फार साधीच सुरवात झाली तरी
भरुन काढू कसर शेवटी शेवटी
जेवढी तुष्टता काळजाची तुझ्या
येत जाते बसर शेवटी शेवटी
रंगला राग हळव्या स्वरांनी तिच्या
धुंद झाला प्रहर शेवटी शेवटी
प्रणय गाठेल जेव्हा समाधी स्थिती
तो दिवा मंद कर शेवटी शेवटी
प्रेम आहे तिचे की जणू वोडका
होत जातो असर शेवटी शेवटी
जी हवी ती मिळाली मला बासरी
तृप्त झाले अधर शेवटी शेवटी
रात्र होता कमलदल मिटू लागले
कैद झाला भ्रमर शेवटी शेवटी
विठ्ठला एकदा रूप दाखव तुझे
जीव घे फारतर शेवटी शेवटी
शेर दृष्टीस पडता समजला कुठे?
स्पष्ट झाले पदर शेवटी शेवटी
प्रेयसीने पुन्हा मोगरा वाहिला
धुंद झाली कबर शेवटी शेवटी
२.
गाडी चुकल्या-मुकल्यावर वेळेची किंमत कळते
आजन्म मुक्या-बहिऱ्याला भाषेची किंमत कळते
फुललेली असते तेव्हा बघण्यास वेळही नसतो
कत्तल झाल्याच्यानंतर बागेची किंमत कळते
दर्शनास जाण्याआधी वारी नाहाया जाते
कार्तीकी-आषाढीला भीमेची किंमत कळते
वनरूम-किचनमध्येही परिवार सुखाने निजतो
मुंबईत आल्यानंतर जागेची किंमत कळते
हाताच्या मोरपिसाने कोणी गोंजारत नाही
आई सोडुन गेल्यावर मायेची किंमत कळते
पोटाची खळगी भरण्या हासून कसरती करते
डोंबाऱ्याच्या पोरीला तारेची किंमत कळते
कित्येक मास खुंटीवर धुळखात ठेवली जाते
सप्ताह जवळ आल्यावर वीणेची किंमत कळते..
निष्पाप तुकारामाची लेखणी बुडवल्या जाते
पाण्यावर तरते तेव्हा गाथेची किंमत कळते
३.
माणसांपासून अंतर राखतो आहे
एक पक्षी उंच घरटे बांधतो आहे.
ध्रूव ताऱ्यासारखी हृदयात जागा दे
मी कुठे ब्रह्मांड सारे मागतो आहे
पाहिली तळमळ तुझी खोटारडी वक्त्या
जेवल्यानंतर भुकेवर बोलतो आहे
आंधळ्याला सर्व दुनिया आंधळी दिसते
तो म्हणुन डोळस जगाला शोधतो आहे
शोध घ्या त्याचा..करा शिक्षा कडक मोठी
जो व्यसन भोळ्या कवीला लावतो आहे
सावलीची समजण्यासाठी खरी किंमत
देव वर्षाला उन्हाळा धाडतो आहे
चंदना उपलब्धता घातक तुझी ठरली
सरपणासोबत तुलाही जाळतो आहे.
हा तुझा सहवास सूर्यासारखा गझले
देह कर्णासारखा तेजाळतो आहे
...............................................

खूप छान सर
ReplyDelete