दोन गझला : मीनल बाठे

 




१.


मालवताना मोठी होते वात जराशी

अजून आई हवीच होती साथ जराशी


बोलायाचे काळजातले बरेच होते

मौन धुक्यातच विरून गेली बात जराशी


सभोवताली लखलखताना आज दिवाळी

अंतर्यामी हिरमुसली फुलवात जराशी


काय खरे अन् खोटे आई तुलाच ठावे

अता कुणाशी करू कशी रुजवात जराशी?


ओसरले अन् भरून आले डोळे  'क्षितिजा'

अता कशी थांबवू सांग बरसात जराशी?



२.


भाष्य जीवनावरचे सुंदर असते पुस्तक 

आठवणींची उस्तवारही करते पुस्तक 


कधी अचानक उदासवाणे होते जेव्हा 

कोमल फुंकर हळूवारशी बनते पुस्तक 


वाट कोणती आयुष्याची ननिवडायाची?

यशस्वीतेचे पथदर्शकही ठरते पुस्तक 


मोरपिसासम हुळहुळणाऱ्या मृदुल स्मृतींचा

साठव करते अन् हृदयाशी जपते पुस्तक 


फसगत होते मजेमजेची जगताना ही

अपुल्यासोबत मनमुरादसे हसते पुस्तक 


आर्त उरीचे भळभळताना कधी अनावर

लेप चंदनी होते जखमा भरते पुस्तक 


असे उतरते सारच अवघ्या आयुष्याचे

शब्द निरर्थक इतुके केवळ नसते पुस्तक


होउन गेले थोर महात्मे कितीतरी ते

वज्रलेप जणु काळजावरी ठसते पुस्तक 


संपून जाते जगणे 'क्षितिजा' अधांतरीचे

अक्षर बनुनी उरते न परी सरते पुस्तक  

...............................…............

No comments:

Post a Comment