दोन गझला : सविता सामंत





१.


चार डोळ्यांतिल कळेना बात कानांना 

हालताही येत नाही त्यात कानांना


काळ म्हणतो की करा रे आत वेळेच्या

एकलव्यासारखे निष्णात कानांना 


भेटिला आसावलेल्या दोन डोळ्यांनी 

ठेवले कित्येकदा दारात कानांना 


ऐकणे हा धर्म आहे ऐकणारच ते 

का बरे काही तिखट म्हणतात कानांना 


काजव्यांचे भरदुपारी चमकणे म्हणजे 

मारले आहे कुणी जोरात कानांना


ओठ, डोळे, नाक यावर ठरवली ओळख

घेतले नाही कुणी लक्षात कानांना


ऐकणे म्हणजेच असते पाहणे त्यांचे 

आंधळे जे आणती प्राणात कानांना 


२.


म्हणून होते भांडण माझ्यातुझ्यात

कायम 

आणतोस तू प्रेम अटींच्या तहात कायम 


मला कधीही नाहित दिसले अश्रू त्याचे

म्हणुन वाटले मासा आहे सुखात कायम


किती वाटले तुला एकदा भेटावेसे  

पुरुन टाकला विचार हा मी मनात 

कायम 


खरा नसुनही सतत जगाला भुलवत आहे 

निळा रंग जो दिसतो आहे नभात कायम 


जरी भोवरा तिच्याच होता उरात कायम

कुठे अडकली नदी तरी भोवऱ्यात कायम 


कसे ओळखू गाणे आणिक विव्हळणे तुझे?

गळा कोकिळा तुझा बोलतो सुरात कायम


काहीसुद्धा ठेवत नाही शिल्लक मागे

जळून जातो कापुर एका दमात कायम 

..….........................................

No comments:

Post a Comment