तीन गझला : सौ कल्पना गवरे

 




१.


कसे कळेना आज एवढी तयार झाले 

हरलेल्यांना जिंकू देण्या उदार झाले


आयुष्याची शाल भरजरी दिली ईश्वरा 

*त्या शालेची मी जरतारी किनार झाले


परंपरा अन् जुन्या रुढींना मोडत गेले

समाजातल्या दांभिकतेवर प्रहार झाले


जातपात अन् घातपातचे उभे मनसुबे 

नष्ट कराया समानतेचा विचार झाले


भ्रष्टाचारामुळे व्यवस्था दुबळी होता 

प्रलोभनांचा मोह टाळता नकार झाले


धोकेबाजांना वठणीवर आणायाला

धारदार जल्लाद अशी मी कट्यार झाले


अन्यायाने पिचलेल्यांना न्याय द्यावया

उठाव करणाऱ्या आत्म्यांची पुकार झाले


विरह वेदना असह्य झाली सख्यास जेव्हा

शीतल छाया द्यावयास मी चिनार झाले


२.


कंटकांचेही इथे मी हार केले

हिणवणाऱ्यांनीच मग सत्कार केले


मनसुबे रचले मला संपावयाचे

शब्दशस्त्रानेच त्यांना ठार केले


हारले नाही कधीही झुंजताना 

संकटांनी एवढे झुंजार केले 


वारसा जपण्यास माझ्या शिक्षणाचा 

शिकविलेले छात्र दावेदार केले


हक्क हिसकावून जगण्याचा जगाने 

पाखरांना केवढे लाचार केले

 

ठेवले होते स्वतःच्या रक्षणाला  

नेमके त्यांनीच होते वार केले


मारण्यासाठी भरारी पंख देवुन 

स्वप्न त्यांचे आज मी साकार केले


स्वाभिमानाने जगावे हे शिकवले 

शिक्षणाने केवढे उपकार केले


कल्पना येताच मी हुश्शार झाले

तोफ डागत शत्रुला बेजार केले


३. 


जगणे थोडे सुसह्य व्हावे म्हणून ठेवू 

काळजामधे क्षण एखादा जपून ठेवू


जगण्यासाठी एक प्रेरणा ठरेल कायम

जिव्हाळ्याच्या नात्याला सावरून ठेवू


काय काय राहिले जीवनी करावयाचे

नोंद अशा त्या सर्व क्षणांची करून ठेवू


जगणे त्यांचे सुसह्य व्हावे याच्यासाठी

नव्या पिढीला अनुभव सारे लिहून ठेवू


विरहामधले एकाकीपण सोसायाला 

आठवणींचा ठेवाही साठवून ठेवू


ठेच लागता रस्त्यावरती चालत जाता

योग्य ठिकाणी आता पाउल बघून ठेवू


अज्ञानाच्या काळोखाला नष्ट कराया

मशाल सदैव ज्ञानाची पेटवून ठेवू

..............................................

No comments:

Post a Comment