तीन गझला : ममता

 




१.


ना कधी पाहिले गोकुळ मथुरा काशी

मी मलाच केले जमा तुझ्या पायाशी


गोडवा किती लांबून चाखते आहे

ती नजर म्हणू की म्हणू तिला मधमाशी


मी जुळवत गेले काळजातले धागे

बांधून घेतला जन्म तुझ्या जन्माशी


तू चाळ जरा इतिहास मागचा वेड्या

पडणार पुढेही गाठ तुझी माझ्याशी


जर उरले नसते काही देणे घेणे

घुटमळले नसते रोज तुझ्या दाराशी


देशील मला तू लाख दुरावा दे ना

मिळतील तुलाही आठवणींच्या राशी


२.


तूच केलीस बघ काय माझी दशा 

रे, तुझ्या दोन डोळ्यांत आहे नशा


मौन ओठांत ठेवून नजरेमधे

हे किती प्रश्न आणि किती चौकशा


चल करू ठीक सारे पुन्हा पूर्ववत

पण चुकाही करूया जशाच्या तशा


गार हिरवे पुन्हा ऊन झाल्यामुळे

भोवती सावल्या छानशा छानशा


ज्यात सामावले विश्व माझेतुझे

त्या मनाच्या व्यथा एवढ्याशा कशा


चार मिनिटांत सरले विषय चारशे

आणि हातामधे राहिल्या कपबशा


मीच होती दिली दाद ओठांतुनी

आज टाळ्या पुन्हा वाजवू का तशा


मी जरा हासले पांगल्या मैफिली

मी रडू लागता केवढा हा हशा


मग पुढे दूर गेले तुझे मित्रही 

ना मला राहिल्या मैत्रिणी फारशा


३.


घुसमटीला आत ठेवूया

यापुढे लक्षात ठेवूया


जीव हा जर आपला आहे

एकमेकांच्यात ठेवूया


देव झाला जर उजेडाचा

वात अंधारात ठेवूया


ना कळू देताच दुनियेवर

लक्ष आरामात ठेवूया


यापुढे प्रत्येक धमकीला

आपल्या धाकात ठेवूया


हा विषय दोघातला आहे

हा विषय दोघात ठेवूया

..…........................................

No comments:

Post a Comment