१.
माणसा तू थांब सुंदर जग बघाया
का उगा करतोस घाई तू मराया
भेट मृत्यूची जशी घडली मला अन्
आणखी खंबीर झालो मी जगाया
भार स्वप्नांचा मनाला हा किती रे
लाकडे पुरतील का इच्छा जळाया?
दु:ख होते मित्र माझे नेहमीचे
दु:ख सरले आणि आले सुख छळाया
वेदना घरच्याच होत्या मज सदोदित
लागले परक्यातले घरचे कळाया
२.
लेखणीस सुंदर शब्दांचा साज पाहिजे
आतला तुझ्या तो मित्रा आवाज पाहिजे
पाहवत नसावे सुख जर मित्रास कोणत्या
मग कशास मित्र तुला धोकेबाज पाहिजे
घेतलास जन्म मराठी मातीत येथल्या
हाच आज रक्तात खरा तर माज पाहिजे
आज लेखणी नांगर दोन्ही सारखे मला
भाकरीस कष्टाच्या कसली लाज पाहिजे
खेळलोय बालपणी मी बिनधास्त नेहमी
तो दिवस सुखाचा सर्वांना आज पाहिजे
..….........................................
No comments:
Post a Comment