तीन गझला : शेखर गिरी

 




१.


भुतासारखी छळते आहे तुझी आठवण

कोठेही मज धरते आहे तुझी आठवण


मनात या अंधार कधी होणारच नाही

दिवा होउनी जळते आहे तुझी आठवण


तिला जणू काहीच आठवत नाही आता

तरी सांगते, करते आहे तुझी आठवण


प्रयत्न करतो रोज जुने विसरुन जाण्याचा  

रोज नवी सापडते आहे तुझी आठवण


आठवणीने उदास आहे मन माझे हे

अन् माझ्यावर हसते आहे तुझी आठवण 


२.


दु;ख केवढे साचत जाते तू नसल्यावर

रात्र केवढी वाढत जाते तू नसल्यावर


किती पोळते थंडगार पाणी अंगाला

आग अंतरी लागत जाते तू नसल्यावर


हवा बिचारी घुटमळते माझ्या भवताली

श्वास घ्यायचे विसरत जाते तू नसल्यावर


लोकांमध्ये असूनही मी नसतो तेथे

कुठेतरी मन भटकत जाते तू नसल्यावर


सैरभैर मन एकेजागी थांबत नाही

इकडुन तिकडे धावत जाते तू नसल्यावर


 कुठे मला नेणार कळेना तुझी आठवण 

काळिज माझे फाटत जाते तू नसल्यावर


अता कधीही थांबावा हा श्वास अचानक

नको नको ते वाटत जाते तू नसल्यावर


३.


दररोज होत आहे भडिमार माहितीचा

गेला फुलून सारा बाजार माहितीचा


प्रत्यक्ष अनुभवांचा आनंद संपलेला

नुसताच काळ आता येणार माहितीचा


शेअर नको करू तू फोटो नि फोन नंबर

करतात लोक हल्ली व्यापार माहितीचा


माझ्यावरी किती ती करतेय प्रेम बघण्या

मी वापरीन म्हणतो अधिकार माहितीचा


येतील खूप अगदी लक्षात दूरवरचे

पण नेमका जवळचा सुटणार माहितीचा 


पाठीवरी जरी तो होता छुपा तरीही

समजून येत होता तो वार माहितीचा


असते कुठे कशी ती तू सांग फक्त शेखर

इतका पुरे जगाया आधार माहितीचा

................................….............

No comments:

Post a Comment