१.
तुझी याद येते गुलाबासवे, तुझा मोगरा मग छळू लागतो
पुन्हा दोन त्या हासऱ्या पाकळ्या, पुन्हा भास तो दरवळू लागतो
जिथे सावलीही नसे आपुली, तिथे आपुला काय शोधायचा
उन्हे उतरणीला जशी लागती, तसा मी इथे मावळू लागतो
रिता मी रिते घर रिता हा चषक, इथे सर्व काही रिते भोवती
युगाच्या तहानेस ओलावया, जुना थेंब मग साकळू लागतो
न मी मोकळा हाय झालो कधी, न तू मोकळी मान्य होते मला
कशाला कवड़सा धरावा मुठी, धरावा तसा तो पळू लागतो
नका बोलवू चांदण्यानो मला, कधीचा विसरलो तुम्हा मोजणे
अता मोजु द्या श्वास माझे मला, अता मीच माझा ढळू लागतो
पुन्हा छेड़ली आज त्याने गझल, पुन्हा मारवा कातरू लागला
कसा त्यास सांगू असे ऐकता, कसा मी गड्या भळभळू लागतो
२.
सोड भिक्षा उशीर झाल्यावर
जाणिवा या फकीर झाल्यावर
ऐक तोवर खळाळ अश्रूंचा
ओठ बोलेल धीर झाल्यावर
हंस संपेल ना इथे वेड्या
हे तुझे नीर-श्रीर झाल्यावर
शून्य होतील बेरजा सगळ्या
अस्मिता या बधीर झाल्यावर
शब्द विणतील शेर जगण्याचे
मन तुझे रे, कबीर झाल्यावर
प्रत्ययाची कलंदरी गालिब
ही कळे फक्त मीर झाल्यावर
३.
मन शब्दांनी बोलत नाही
जग डोळ्यांना मोजत नाही
दूर कशाला जातो इतका
घरचेही तर समजत नाही
आकाशी डोळा इच्छेचा
कुठला तारा निखळत नाही
सांगायाचे दिवसच गेले
फोडुन घ्या जर बघवत नाही
मी सर्वांना दार उघडतो
पण ती खिड़की उघडत नाही
तू नसतानाही तू असते
मग डोळ्यांना करमत नाही
आजकाल मी वारा झालो
कुठे जायचे ठरवत नाही
डोम्बाऱ्याचा खेळ वेगळा
गलका म्हणजे जनमत नाही
जा मागे अन् आठव काही
का जगण्याला बरकत नाही
............…................................

No comments:
Post a Comment