१.
आधी जमीनजुमला वाटा म्हणा बरोबर
वाटा समान द्या मग आरक्षणाबरोबर
समजून आपला मी ज्याला उरात जपले
माझ्यावरी निघाला त्याचा फणा बरोबर
कोणीच दूर नसते गेले तुझ्या जवळचे
नसतास ठेवला जर तू 'मी'पणा बरोबर
एका क्षणाकरीता होतीस सोबतीला,
त्याची बरोबरी मी करतो सणाबरोबर!
बाहूवरी छताच्या देते जबाबदारी
घरची नि दारचीही तो पाळणा बरोबर
नेता जरी स्वतःची तुलना करी भिमाशी,
कोणीच पदधुळीच्या नाही कणा बरोबर!
'लंकाय जंबुदीपे' बुद्धावशेष मिळते,
ठेवून सूर्य साक्षी धरती खणा बरोबर
२.
पिंपळाचे मूळ साऱ्या विश्वभर पोहोचले
बुद्ध सापडतो मला जर मी धरेला खोदले
धम्म-तत्त्वांनी जगावर छाप इतकी सोडली,
बुद्ध पृथ्वीने स्वतःच्या काळजावर कोरले
शिल्प गाभाऱ्यातले बघ चांगले न्याहाळुनी
मग तुला समजेल की तू स्तूप आहे चोरले
बांधले कोणी सुखासाठी स्वतःच्या बंगले
विश्व कल्याणास कोणी राजवाडे सोडले
सौख्य दारी नांदण्यामागील कारण, गौतमा,
दुःख होण्यामागचे कारण खरे तू शोधले!
३.
काही म्हणा तुम्ही पण आहे कमाल सत्ता
देते लिहावयाला दुर्मिळ खयाल सत्ता
मतदार मावळ्यांची भुमिका मवाळ झाली
झाली म्हणून इथली भलती जहाल सत्ता
चितही तिचीच होते पटही तिचाच येथे
दोन्हीकडून म्हणते माझीच लाल सत्ता
बेरोजगार लाखो सलमान खान येथे
ऐश्वर्य भोगणारी स्नेहा उलाल सत्ता
मंदीर मस्जिदींचा चालेल वाद जोवर
उधळत अशीच राहिल तोवर गुलाल सत्ता
शोषून रक्त आणिक पैसा लुटून अमुचा
ही आयती मलाई खाते दलाल सत्ता
राष्ट्रीय लाजलज्जा अवघी विकून बसली
उठली जिवावरी ही साली छिनाल सत्ता
...…......................................

तीनही गझला अप्रतिम दादा
ReplyDelete