तीन गझला : जयकुमार वानखडे

 



१.


कधी नाही कळत पाऊस, थंडी, ऊन बैलाला

मला मग बाप आठवतो खरा; पाहून बैलाला


विजेचा लागला धक्का नि मेला यार सोबतचा

ढसाढस बैल रडला बघ किती बिलगून बैलाला


झळाळी फक्त सोन्याची नि सोन्याची दिली त्याने,

कसोटीने कितीदा पाहिले घासून बैलाला


कसेही आणि कुठलेही बिचारा काम तो करतो

दिला आहे असा हा देह अफलातून बैलाला


'खट्या' थकल्यावरी मग व्हायची अडचण सदा त्याची

दिली मुक्ती सदासाठीच गोठ्यातून बैलाला


न सापाचा न विंचूचा कशाचाही न धोका पण;

इथे बस फक्त धोका माणसांपासून बैलाला


२.


कुणामुळे तो घेतो फाशी शेतामध्ये?

ढसाढसा बघ रडे कपाशी शेतामध्ये


शेतीसाठी माझी मी सोडेन नोकरी

निश्चय केला मीच मनाशी शेतामध्ये


देव शोधण्या फिरू कशाला इकडेतिकडे

हरीद्वार अन् आहे काशी शेतामध्ये


वाऱ्यासोबत, मातीसोबत वा झाडांशी

बोलत असते गवत कुणाशी शेतामध्ये


हिरमुसणारी फुले सुगंधी काय करू मी

नाते जुळले रानफुलाशी शेतामध्ये


३.


नाती जर का कुजली सडली, तर विषय हार्ड समजा

माणुसकी तोंडावर पडली, तर विषय हार्ड समजा


तिला पाहुनी प्रत्येकाची छाती धडधड करते

जरा हार्टची, बीट बिघडली, तर विषय हार्ड समजा


यासाठी मी बंद ठेवतो हृदयामधील संदुक

तिची आठवण जर सापडली, तर विषय हार्ड समजा


दरवाजाच्या पल्याड आहे उभी प्रेयसी माझी

आणि कदाचित, नियत बिघडली, तर विषय हार्ड समजा


तिच्या जराशा रुसण्याने मी घर डोक्यावर घेतो

माझ्यासमोर जर ती रडली, तर विषय हार्ड समजा

...............................................

1 comment: