१.
तिच्या घेऊन प्रेमाचा जुना आधार लोकांनी
उगा बदनाम केले हो मला बेकार लोकांनी
अता माझी कराया लागले ते वाहवाही पण
अगोदर तर मला वाईट म्हटले फार लोकांनी
बघा ना एकदा सारा जमाना होउनी डोळस
शरम विकली असे वाटेल इज्जतदार लोकांनी
इथे रस्त्यावरी सुद्धा प्रणय बिन्धास्त चालावा
किती माणूसकीची हद्द केली पार लोकांनी
जगाला मानलो माझे जगाचा मीच झाल्यावर
उभ्याजन्मी दिली सोबत मला दिलदार लोकांनी
कुणाचे स्वप्न पुरवाया कुणी वाटेल ते केले
कुणाचा मोडला सुंदर सुखीसंसार लोकांनी
कमळ, पंजा, धनुष्याने जरी वेडे बनवले तर
शहाणे व्हायचे आहे अता मतदार लोकांनी
२.
येथे समानतेचा लोकात बेत नाही
माणूस माणसाला आधार देत नाही
श्रीमंत माणसांची चर्चा जिथे तिथे पण
गरिबा तुझी कुण्याही चर्चा सभेत नाही
शेती करून थकला बा जन्मभर तरीही
भरगच्च ते कधीही पिकलेच शेत नाही
मजला जगातले या कळते खरे नि खोटे
मी अंधभक्त नाही वा मी नशेत नाही
घेऊन जा विठोबा मज दूर तू असा की
जिथुनी कुणी कधीही परतून येत नाही
..............................................
No comments:
Post a Comment