१.
अशा या रुक्ष डोळ्यांनी इशारे काय कामाचे
नदी आटून गेल्यावर किनारे काय कामाचे
मला तो चेहरा सुंदर तिचा दिसणार नाही तर
इथे उगवूनही दररोज तारे काय कामाचे
ऋतू हा वांझ वाटू लागला आहे वसंताचा
जवळ नाहीस तू मग हे फवारे काय कामाचे
तुझे अस्तित्व मातीमोल माझ्या जीवनासाठी
तृषार्ताला समुद्रा नीर खारे काय कामाचे
असे पेटून उठताना हजारो पाहिले किस्से
क्षणातच राख झालेले निखारे काय कामाचे
असावा मित्र एखादाच, तोही आरशावाणी
बढाया शेकडोंनी मारणारे काय कामाचे
कुणाचे पोट पाठीला, कुणाचे बाळ छातीला
बिगारी लावलेले हे बिचारे काय कामाचे
२.
तू गुन्हा समजून का साध्या त्रुटीला
जीव माझा आणला मेटाकुटीला
हुंदके देऊन मी बेभान रडलो
फक्त हे कारण पुरेसे ढगफुटीला
एवढी झाली सवय ठेचाळण्याची
पाय घाबरतात आता राहुटीला
बघ प्रथम प्रवृत्त केले तूच मजला
मग पुढे सरसावलो ताटातुटीला
आत्महत्येला व्यथा माझी निघाली
छेडणे शिकवा कुणी त्या पळपुटीला
३.
वृत्तामधून नाही; वृत्तीमधून यावी
अपुली गझल नभाच्या मुक्तीमधून यावी
त्यांचा विरोध होता प्रत्यक्ष वागण्याला
क्रांती कशी प्रभावी उक्तीमधून यावी?
इथली तमाम जनता झाली खऱ्याविरोधी
ही योजना कुणाच्या क्लृप्तीमधून यावी?
ठेवा किमान इतके लक्षात वंचितांनो
चैतन्यता उद्या या सुस्तीमधून यावी
समृद्ध भारताची आता नवीन सत्ता
नैतिक अशा युवांच्या युक्तीमधून यावी
जोडून हात दोन्ही इतकेच मागतो मी
पाठी जखम जवळच्या गुप्तीमधून यावी
बस एवढ्याचसाठी स्वीकारली फकीरी
जन्मास एक इच्छा तृप्तीमधून यावी
...............................................

No comments:
Post a Comment