१.
मी इच्छेला फास लावला
अन् जन्मठेप भेटली मला
फिरून येते गल्लीत तुझ्या
नेतोय कुठे जन्म च्यायला
जगून झाल्यानंतर कळले
अवघड आहे किती ही कला
खांद्यावरती घेऊन वखर
या विश्वाचा बाप वाकला
सोडून मला गेला बाबा
भारी जाते हे पचायला
ही तडफ आवडीची झाली
मला कोणता जीव चावला
मी त्याच्या स्वप्नात हरवते
लगेच आई उठवते मला
२.
मांजर नि बोक्याची लढाई, ही बरी नाही
खोटारडा आहेस तू मीही खरी नाही
प्रस्ताव रस्त्यांचा विधानसभेत द्या कारण
सरपंच आहे रे, कुणी मी गडकरी नाही
इतका नको ना वाढवू तू वेग गाडीचा
मज जायचे आहे घरी देवाघरी नाही
भेटायला जर वेदना आली घरी माझ्या
आई तिला सांगायची की ती घरी नाही
उठवू नको आता मला मनसोक्त झोपू दे
माहेरला आले इथे मी सासरी नाही
३.
कळले नाही मला बहूधा म्हणून माती खाल्ली
प्रेम वगैरे सर्व ठिक, लग्न करून माती खाल्ली
मातीचे घर नाही सिमेंटच्या भवताली भिंती
बघुन विचारत होती आई कुठून माती खाल्ली
शहरामध्ये अजूनही घर घेता आले नाही
गावी होती नव्हती शेती विकून माती खाल्ली
डिग्री झाली तरी नोकरी अजून नाही भेटत
बाप म्हणाला लेका शाळा शिकून माती खाल्ली
धडधाकट होतो बालपणी काहीच होत नव्हते
कैर्या खाल्ल्या, चिंचा खाल्ल्या, लपून माती खाल्ली
शपथा बिपथा वचने बिचने चुलीत गेले सारे
माझ्या इतकी गोड प्रेयसी असून माती खाल्ली
फुकटही पुढारी गावाला फिरकत नाही आता
मूर्ख माणसा अमूल्य मत तू विकून माती खाल्ली
.............................................
No comments:
Post a Comment