तीन गझला : रोहिणी पांडे




१.



येऊ देते सुख-दुःखाला टोकत नाही

सरावल्यावर, जखम जराही बोचत नाही


आनंदाच्या गल्लीमधुनी येते जाते

तरी वेदना काही केल्या संपत नाही


अभिप्रायांच्या सुंदर सुंदर अभ्र्यांखाली

रात्री माझी उशी कोरडी राहत नाही


माहेरातुन सांगावा का येतो केवळ?

तिकडे सुद्धा वाट कुणीही पाहत नाही


रोज वेदना पिऊन घेते आनंदाने

त्या सवयीने तहान माझी भागत नाही


पत्ता शोधत व्यथा कधीही धाड मारते 

तरी घराची पाटी कोणी झाकत नाही


थोडे असता हिरवेपण हे पान गळावे 

पिकल्यावरती किंमत कोणी ठेवत नाही


२.


कुणाकुणाची मर्जी राखत नकोच जगणे केविलवाणे 

आता ठरले, जरा कुठे मी जगते आहे मनाप्रमाणे


कुणी करू दे कौतुक अथवा कुणी करू दे हेवेदावे

अनुरागाच्या नशेत गाते आयुष्याचे सुरेल गाणे


कठपुतली जर तुला हवी तर प्रेमाच्या का बाता करतो?

समजतोस तर समजत बस तू फक्त स्वतःला अती शहाणे


खोड जित्याची जातच नाही काही केल्या काय करावे

वागत असतो तसेच तो पण शोधत शोधत नवे बहाणे


उगाच झुरते अशी कशी तू मस्तीमध्ये जर तो जगतो?

लगेच पटकन सोड अता तू जगणे-बिगणे उदासवाणे


३.


पुष्कळ झाले आता भांडण, जाऊ दे ना !

पुन्हा एकदा दे आलिंगन, जाऊ दे ना !


पानगळीचा ऋतू संपला दोघांमधला

आज जपूया ये हिरवेपण,जाऊ दे ना !


याचे त्याचे काय कसे हा घोर जिवाला

सोड कशाला घेतो टेन्शन, जाऊ दे ना !


माझे माझे बघेन मी, तू थांब जरासा

नकोस देऊ उगाच भाषण, जाऊ दे ना !


स्पर्धेमध्ये धावत जगतो, थकला ना तू 

नकोस घेऊ इतके दडपण, जाऊ दे ना !


मातृदिवस अन् पितृ दिवस हे कसे ठरवतो?

जन्म आपुला त्यांचे आंदण, जाऊ दे ना !


रस्त्यावरची बॅनरबाजी नको नकोशी

नावच मोठे, खोटे लक्षण ; जाऊ दे ना !

…….......................…............

No comments:

Post a Comment