१.
कोणता हा रोग समजेना मला
एवढ्या गर्दीत करमेना मला
त्या क्षणी होकार मी नाही दिला
रात्र सरली झोप लागेना मला
शोधल्यावर चक्क सापडली घरी
शांतता विश्वात भेटेना मला
हद्द झाली धीर धरवेना मला
नेमकी मी कोण उमजेना मला
ठेवते हृदयात ओली मग जखम
भार शब्दांचाच पेलेना मला
२.
कुठे म्हणते तुला काश्मिर उटीला चल खरोखर
मनाला गारवा मिळतो रहा माझ्या बरोबर
कधी जर वेळ आली तर कुणी नसते कुणाचे
कशाला लक्ष देऊ मी जगाच्या बोलण्यावर
अचानक हुंदका आला मलाही बोलताना
जगाने काय समजावे तुझा आवाज कातर
किती बोलायचे होते दिवस पुरला कुठे पण?
नको लोकांत चर्चा मी उद्या येईल लवकर
तिने ललकारले त्याला तसा तो गार पडला
पुन्हा केव्हाच तो नाही म्हणाला बांगड्या भर
३.
ढासळलेल्या वाड्याच्या दगडांशी बोलत होते
भातुकलीच्या आठवणी अलगद कुरवाळत होते
ते तत्परतेने गेले माघारी माझ्या देखत
वादळ वाऱ्याला हल्ली मी तर गोंजारत होते
टाळू म्हटल्याने टळले नाही दोघांचे नाते
कोर्टाच्या कट्ट्यावरती डोळ्यांनी भेटत होते
रंगवले मी केसांना अन् थोडेसे ओठांना
मी साध्वी मेळ्यामधली लोकांना वाटत होते
आई ठेवावी कोठे दोघेही भांडत होते
भाऊ-भाऊ चंद्रावर घर मोठे बांधत होते
.......................…...................
प्रा. सौ.सुनीता गुंजाळ -कवडे,धाराशिव

No comments:
Post a Comment