गझलचे विविध प्रकार : डॉ. संगीता म्हसकर

 



 

एक वैशिष्ट्यपूर्ण असा काव्य प्रकार असलेल्या गझलचे अर्थातच विविध प्रकार सुद्धा आहेत.


 गझल लिहिणे आणि ती सादर करणे, या दोन्ही गोष्टी गझलसाठी सारख्याच प्रमाणात महत्त्वाच्या ठरतात.

म्हणूनच, गझलचे वर्गीकरण करताना या दोन्ही दृष्टिकोनांचा विचार केला जातो.


गझलचे सादरीकरण


 साधारणपणे गझलच्या सादरीकरणाच्या, प्रचलित अशा तीन पद्धती आहेत.


1. पहिली पद्धत म्हणजे तहद !

 

यात गझल जशी लिहिली जाते तशीच व्यवस्थित रीतीने आणि मुख्य म्हणजे सुयोग्य उच्चारांसहित सादर केली जाते. यात गझलच्या शब्दांना लाभलेला अनुरूप असा‌ भाव, अत्यंत महत्त्वाचा असतो. त्याचप्रमाणे, मिसरा कुठे संपवायचा याचीही काळजी घ्यावी लागते.


दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे यात गझलच्या वृत्ताचे वजन लक्षात घेऊन ती सादर करायची असते. अर्थातच अशा प्रकारे सादर केलेली गझल मुशायऱ्यात अचूक प्रभाव साधून जाते. तहद शैलीनुसार गझलचे वजन समजावून घेणे, हे गझल गायकांसाठी सुद्धा उपयुक्त ठरते. किंवा त्यांना ते आवश्यकच असते.


2. गझलच्या सादरीकरणाची दुसरी शैली म्हणजे तरन्नूम !


तरन्नूम, या शब्दाचा अर्थ आहे स्वरमाधुर्य! अर्थात गाऊन सादर केलेली गझल 'तरन्नूम' या नावाने ओळखली जाते. यात पारंपरिक किंवा नवीन अशा दोन्ही चाली अभिप्रेत असतात. गझलेत उपजतच असलेली सांकेतिकता यात उपयुक्त ठरते. काही जण याच  गझलला 'खुली गझल' किंवा 'महेफिल की गझल' असेही म्हणतात.


3. गझलच्या सादरीकरणाची सगळ्यात प्रचलित आणि लोकप्रिय असलेली शैली म्हणजे तर्ज !


ही गझल नियोजित आणि तालबद्ध अशी असते. तिचे सादरीकरण वाद्य वृंदासह केले जाते. काही ठिकाणी या गझलचा उल्लेख 'बंदिश गझल' असा देखील केलेला दिसतो. पण, तर्ज हेच नाव सर्वसाधारणपणे  प्रचारात असल्याचे आढळते.


तर एक काव्यरचना म्हणून अर्थात साहित्यिक दृष्टिकोनातून गझलचे प्रकार विचारत घेताना, हे प्रकार म्हणजे गझलच्या वाटचालीतले, तिच्या विकासाचे टप्पे असल्याचे लक्षात येते. 


प्रामुख्याने शृंगारिक काव्यरचना म्हणून गझलचा जन्म झाला पण काळाबरोबर तिच्या कक्षा विस्तारीत होत गेल्या. सर्वार्थाने व्यापक झाल्या. शृंगारिक गझल, हा गझलचा पहिला टप्पा किंवा प्रकार मानला जातो. 'रिवायती गझल' या नावाने ओळखली जाणारी ही गझल म्हणजे गझलचे मूळ रूप होय. शृंगार प्रधानता हेच तिचे वैशिष्ट्य होते. पर्शियन साहित्यातून उर्दू साहित्यात आलेली ही रिवायती गझल हळूहळू बदलत केली. पारंपरिक आणि शृंगारिक अशा मूळ अर्थात एक वेगळाच लाक्षणिक अर्थ जाणवू लागला. साधारणपणे विसाव्या शतकात अशा गझलांचे प्रमाण वाढत गेले. ही गझल 'तरक्की पसंद गझल' या नावाने प्रचलित झाली. सुधारणावादी, प्रगतीवादी किंवा विद्रोही गझल अशी नावे देखील तिला दिली गेली. सरदार अली जाफरी, फैज अहमद फैज, कैफी आज़मी इत्यादी शायर  या गझलचे प्रातिनिधिक शाहीर ठरतात.


विसाव्या शतकापासून उर्दू गझलवर टीका होण्यास सुरुवात झाली होती. याचा अर्थ असा नक्कीच नाही की यापूर्वी गझलेत नवीन प्रवाह आलेच नव्हते किंवा गझलेतले दोष कोणी दाखवले नव्हते. गालिबला तर त्या काळातही गझलेत सुधारणा व्हावी असे वाटत होते. आणि त्यांनी त्यासाठीच गझलला वेगळे वळण देऊन त्यात विलक्षण क्रांती घडवून आणली होती. थोडक्यात काळाबरोबर सुधारणांची, नवमतांची प्रक्रिया सतत सुरू असते. याच नियमानुसार तरक्की पसंद गझलेतही कालांतराने एकसुरीपणा जाणवू लागला. त्यातही काही बदल घडावा, गझलेत पुन्हा नवा प्रवाह यावा या हेतूने, ' जदीद गझल' उदयाला आली. नवी गझल, प्रयोगवादी गझल, आधुनिक गझल अशा वेगवेगळ्या नावांनी ही गझल प्रचलित झाली आणि लोकप्रिय सुद्धा झाली.


सामाजिक विषयांना हात घालणारी ही गझल, बदलत्या सामाजिक आणि राजकीय परिस्थितीमुळे हतबल झालेल्या सर्वसामान्य माणसाच्या व्यथेचे बोलके चित्र ठरली.


नव्या युगाची नवी संवेदनशीलता हीच तिची व्याख्या बनली. निदा फाज़ली, फिराक़ गोरखपुरी आणि असे अनेक शायर या गझलचे उल्लेखनीय प्रतिनिधी मानले जातात.

.......................…....................

No comments:

Post a Comment