गेय काव्य म्हणजे छंदबद्ध किंवा वृत्तबद्ध कविता, वेळ देऊन साकारली जाते. बरे, वेळ देऊनही ती पूर्ण होतेच असे नसते आणि होत नाही असेही नसते. त्यामुळे अनेकांचे एकेक, दोन-दोन सुटे शेर तसेच पडून राहतात. कधी कधी एखादा विचार, अनुभव, कल्पना यांचे आशय (खयाल)ही हवे तशा प्रभावीपणे मांडण्यासाठी आपण थांबून राहतो. कारण त्याला वेगळे कसब लागते. ते असले तरी चपखल शब्द सापडण्यास वेळ लागतो ! अन्य लेखन मात्र ठरवून पूर्ण करता येते. गझलेतील आणि अन्य लेखनातील हे अंतर त्यांच्या ध्यानात येते, जे गेय काव्य किंवा गझल अखंडपणे लिहीत राहतात. १९९० ते २००० या काळात भटांच्या प्रभावातून बाहेर पडून आपली गझल लिहिणारा एक वर्ग पुढे आला. परंतु त्याकडे जवळपास २०००-०५ पर्यंत कुणी यासाठी लक्ष दिले नव्हते की बहुतेकांना असे वाटत होते की भटांच्या अनुकरणात चार-सहा वर्षे लोक गझल लिहितील. नंतर अनुकरणाला मर्यादा पडल्यावर एकतर थांबतील, नाहीतर निमुटपणे मुक्त कविता किंवा अष्टाक्षरीकडे वळतील. कारण वेगळी गझल लक्षणीय प्रमाणात तसेच प्रभावी स्वरुपात लिहिणे कुणाला साधणार नाही. त्यापैकी एक खरे झाले की अनुकरणाबाहेर न पडणारे संपलेत किंवा दुसरे काहीतरी लिहू लागलेत. पण त्यावेळी काही मोजके लोक असे होते की ते एकीकडे भटांनी खरेच आपल्या काळापुढील कविता, गझल लिहिली, हे मान्य करून दुसरीकडे असा विश्वास बाळगून होते की भटांच्या विषयांपलीकडील तसेच त्यांच्या शैलीबाहेरील गझल लिहायला मराठीत वाव आहे. कारण अमरावती नागपूरच्या पलीकडे किती मोठे विस्तारित 'मराठी जग' आहे. त्यानुसार खरोखर त्यांनी वेगळी गझल लिहिली. ती कुणाला किती आवडेल, तिला कोणती परिमाणे लागतील आणि कोणती लावली की ती माघारेल हा भाग वेगळा. पण त्यांनी आपली भाषा, आपले शब्द आणि आपल्या जगण्याची गझल आणली आणि भटांना तेच तर अभिप्रेत होते. नवीन लोकांनी नवीन शैलीने नवीन विषयांची गझल लिहिणे यात आश्चर्य काहीच नाही. बघा- जर संपूर्ण हिंदुस्थानी गझलवर ध्यान दिले तर स्पष्ट दिसते की 'मीर-गालिब' गेल्यावर 'दाग'-'मोमीन' यांनी आपली गझल लिहिली. 'जिगर'-'फिराक' नंतर 'बद्र'-'फराज' आलेत 'राना'-'राहत'-'नासीर'-'परवेज'- 'फाकीर'...एवढेच नव्हे तर अजगर गोंडवी, यास यगाना चंगेजी आणि चित्रपट सृष्टीत 'मजरूह', 'जां निसार अख्तर', 'साहीर', शहरयार...अशी मंडळी भारतीय वातावरणात आपापली गझल लिहीत होते. हिंदीत 'निराला', रामप्रसाद 'बेताब', लालचंद 'फलक', यांच्या रांगेत आलेल्या दुष्यंत कुमारांनी आपली वेगळी आणि समकालीन छाप आणली. इथे आपला व्यासंग थिटा पडतो. वरील उर्दू-हिंदी दोन्ही नावात आणखी कितीतरी शायर - कवी असतील. म्हणजे ज्या प्रकारच्या काव्यनिर्मितीची शक्यता आणि क्षमता हिंदी-उर्दूत आहे, ती शक्यता क्षमता मराठीत नाही. असे गृहीत धरणे म्हणजे हा एक खोलवर थिजून टणक झालेला न्यूनगंड नव्हे काय? नाव सांगता येत नाही, पण काही समीक्षक तर म्हणत होते की मराठीचा पिंडच 'गझल'ला सुसंगत नाही. या लोकांना प्राचीन नाट्यलेखक भरताचे सुभाषित सांगणे आवश्यक आहे.-
'छन्दो हिनो न शब्दोस्ति न छंद: शब्दवर्जित: '
म्हणजे- शब्द हे छंदाविना नसतात आणि छंदांना शब्द वर्ज्य नाहीत. लक्ष देऊन बघाल तर माणूसच नव्हे, तर या संपूर्ण सृष्टीला एक लय आहे, एक ताल आहे. सर्वांना विशिष्ट हेलकावे आणि आंदोलने आहेत. त्यातून निर्माण होणाऱ्या सौंदर्याचे सर्वांना अल्पाधिक वेड असते. त्यामुळे मराठीच्या शब्द निर्मितीत ते कसे नसेल? समान लयीचे आणि उच्चारसाम्याचे शब्द आपल्याही पूर्वजांनी मराठीत आविष्कृत केले आहेतच ! बघा- उद्देश, निर्देश, आदेश, आवेश, समावेश, परिवेश, अनुशेष....यांना छंद आहे तसे उच्चार साम्यही आहे ना? आणि मराठीत 'गझल' ही काव्यविधा शक्य नाही असे म्हणणे म्हणजे तिची तेवढ्या संदर्भात अनावश्यक आणि अज्ञानमूलक मर्यादा मान्य करणे नव्हे काय? म्हणजे हे असं दळभद्र कार्टं आहे की ते सांगते - "माझ्या आईला पुरणपोळी करताच येत नाही." अरे, तिला डाळ आणि गुळ आणून तर दे आणि मग बघ ती कशी खरपूस पुरणपोळ्या करते तर ! माझी मायमराठी कोणत्याही काव्यविधेसाठी उणी पडत नाही-
'तलाव दर्या नदी झरे वेगळेच होते
हरेक ऐन्यात रूप बाकी तुझेच होते
प्रचंड भांडार मायबोलीत साठलेले
हवे तसे काफिये इथे आयतेच होते'
जेंव्हा जेंव्हा मराठीला अभिजात भाषेचा 'वर्ग' किंवा 'श्रेणी' (निदान तिला अभिजात भाषा म्हणताना तरी परभाषेतील 'दर्जा' शब्द वापरण्याचा दरिद्रीपणा न करता 'वर्ग' किंवा 'श्रेणी' असे शब्द योजावेत.) देण्याचा प्रश्न उपस्थित होत असे, त्यावेळी आमचे बाजीराव पाटील तर म्हणत - "मराठीत जो पोवाडा लिहिला जातो, तो दुसऱ्या भाषेत लिहून दाखवा आणि तसा ठसक्यात म्हणून दाखवा." तेच मराठीत कव्वाली कशी असते याची काही उदाहरणे आहेत. त्या अधिक लिहिल्या गेल्या नाहीत पण ज्या आहेत त्या कव्वाल्या चांगल्या गाजल्यात. सांगायचा हेतू हा की तुम्ही 'गालिब'ला 'जिगर'मध्ये आणि 'फिराक'ला 'शहरयार'मध्ये शोधू नका. आठवण किंवा कृतज्ञता ठीक आहे. पण काकूंच्या हातून घेतलेल्या शिऱ्याच्या बशीत 'आईच्या हातचा शिरा' शोधला की वांधे होतात. जसे की आज वयाची साठी पार करणाऱ्या आणि केलेल्या लोकांची तक्रार आहे की आजच्या गझलेत काव्याचा अभाव जाणवतो. अहो काका, ती जर छंद किंवा वृत्तात आहे तर तिला लय-ताल आहे. लय आणि ताल ही प्रमुख काव्य लक्षणे नाहीत काय? हे तर स्पष्ट आहे की 'साहीर'ची 'संसार की हर शै का इतनाही फसाना है... ', 'मैं पल दो पल का शाईर... ' ही गाणी जीवनाचे तत्त्वज्ञान सांगतात. आणि आनंद बक्षींची- 'आदमी जो कहता है... ', 'जिंदगी के सफर में गुजर जाते हैं... ', ही गाणीही जीवनाचे तत्त्वज्ञानच सांगतात. मात्र 'साहिर'च्या गाण्यातील 'काव्य' आपणास हळवे करते तर नंतरच्या आनंद बक्षींच्या गाण्यातील 'अनुभव' वेगळा चटका लावून जातो. काव्यसौंदर्य हा जाणून घेण्याचा विषय आहे. अनुभव तर आपल्या अनुभूतीशी संबंधित आहे. इथे कोण दुय्यम किंवा कोण अग्रभागी वगैरे करण्याचा भागच उपस्थित होऊन नये. उलट 'साहिर'च्या लेखनातील 'आनंद' वेगळा आणि आनंद बक्षी यांच्या लेखनातील किमयागार (साहीर) वेगळा हे लक्षात घेणे आवश्यक आहे. हे समजून घेतले तर आजच्या गझलला आपण न्याय देऊ शकू. अशा 'आज'च्या गझलेत गजानन वाघमारे यांची गझल श्रोत्या-वाचकांना चुंबकाप्रमाणे आकर्षून घेते. अंबेजोगाईच्या संमेलनात त्यांनी आणि मी सोबत गझल सादर केली. तेंव्हा त्यांनी ऐकवलेली गझल मी आधीच फेसबुकात वाचली होती.-
गरज इतक्यात अश्रूंची पडत नाही
कुणी मेला तरी कोणी रडत नाही.
व्यथांचा छान मोहरतो ऋतू माझ्या
फुलोरा जीर्ण जखमांचा झडत नाही
गुरांच्यासारखा कळपात वावरतो
इथे माणूस होणे परवडत नाही
उपाशी आतड्यांमध्ये फिरुन आलो
भुकेचा केंद्रबिंदू सापडत नाही'
लागलेली भूक बाजूला ठेवून आतडे फिरून येणे आणि भुकेचे केंद्र शोधणे यासाठी किती कल्पकता हवी? आणि तडजोड किती करावी? की जगायचेच आहे तर माणूस म्हणून राहणे सोडून कळपाच्या पद्धतीत स्वत:ला बसवून जगावे ? एकदा पारतंत्र किंवा वाळीत टाकलेली अवस्था आपण समजू शकतो (समजू शकतो, त्यांचे समर्थन नाही हां !) पण जाणीवपूर्वक आपला चेहरा-मोहरा-ओळख विसरून कळपाचे सदस्य होणे म्हणजे... गजानना ! अठराव्या शतकात अमेरिकेतील संस्थाने ब्रिटीशांच्या अधीन होती. अमेरिकन सुप्रसिद्ध वक्ता आणि तत्कालीन व्हर्जिनिया संस्थानमधील कायदे मंडळाचा सदस्य 'पेट्रिक हेनरी' (१७३६ - १७९९) तेथील सभेत अमेरिकेतील जनतेच्या वतीने 'स्टेम्प एक्ट' विरोधात भाषण करताना शेवटी म्हणाला होता - ".....मला स्वातंत्र्य द्या किंवा मला जीवे मारा" पारतंत्र्यापेक्षा कोणत्यातरी विवशतेमुळे जाणीवपूर्वक आपली ओळख विसरून वेगळी दशा पत्करणे ही केवढी शिक्षा म्हणावी? एकदा मी-
'घातकी झालेत रस्ते वाहने काबूत नाहित
काय प्रेते ओळखावी चेहरे शाबूत नाहित'
असा 'मतला' लिहिला. मग ती गझल पुरी करताना पुढे मला त्या मतल्यात रस्ते, वाहने आणि अपघात या पलीकडील आशय दिसला. अपघात केवळ वाहनांचा आणि रस्त्यावरच होत नाही, तर तो जगण्यातही होतो. जे आपणास पटत नाही तेही स्वीकारावे लागते. वैचारिक तडजोडी कराव्या लागतात. तेंव्हा तेही अपघातच असतात आणि त्या तडजोडीत आपल्या 'व्यक्तिमत्वा'चा 'चेहरा' शाबूत राहत नाही. असाही वेगळा आशय त्यात डोकावू लागला. 'मजरूह'चे एक विधान आहे की गझलचा शेर थेट किंवा नेमके विधान करीत नसून केवळ कुठल्यातरी दिशेने बोट दाखवतो. मग ज्याला जे दिसेल त्याने ते बघावे ! गजानन वाघमारेंचा-
भुकेचे केंद्र कोठे सापडत नाही' हा एक 'मिसरा' 'आत्मा', 'मन', 'ईश्वर' या संकल्पना समजावून सांगताना आधार म्हणून कामात येऊ शकतो. मानसोपचार तज्ज्ञ म्हणतात मेंदू आहे, पण मन म्हणून अवयव कुठेच नाही. आत्मा कुठे आहे? ईश्वर कुठे आहे? तसाच भुकेचा केंद्रबिंदू सापडणार नाही. भूक ही अनुभवावी लागते. तसे आत्मा आणि ईश्वर हे अनुभवण्याचे विषय आहेत. असे ईश्वरवादी म्हणू शकतील. वाघमारे यांनी ईश्वरवाद्यांचे काम सोपे केले. ही मानली तर गझलची आणि वाघमारे यांच्या काव्याची मोठी उपलब्धी आहे असे मी मानतो.
वाघमारे यांनी मला जेंव्हा प्रस्तावनेसंबंधी विचारले तेंव्हा मला उमगले नव्हते. आजही समजलेले नाही की त्यांच्या मागणीत संकोच का होता? कदाचित प्रस्तावना देण्यासाठी समोरच्या कवी-लेखकाच्या रचना, लेखन वाचून उल्लेखनीय स्थळांवर खुणा कराव्या लागतात. नंतर 'पीसी' किंवा 'ट्याब'वर पाच-सात तास बसून ते 'ठोकावे' लागते. म्हणजे एका प्रस्तावनेला सराव असेल तर एकूण आठ ते दहा तास लागतात. कदाचित हे करणे अनेकांना शक्य नसावे. पण वाघमारेंच्या शेरांमधील आशय कुणालाही चटका लावावा असे आहेत. त्यामुळे मी त्यांना उलट म्हणालो की त्यांच्या संग्रहासाठी प्रस्तावना लिहिणे ही संधी आहे, भाग्य आहे ! बघा- आईनस्टाईनला विचारले होते की तिसरे महायुद्ध कोणत्या शस्त्रांनी लढले जाईल? त्यावर तो म्हणाला होता की तिसरे सोडा पण चवथे महायुद्ध दगड-धोंड्यांनी आणि काठ्या-दोऱ्यांनी लढले जाईल. याचा अर्थ तिसरे महायुद्ध इतके विनाशी असेल की त्यानंतर पृथ्वीवर मानव निर्मित काहीच उरणार नाही. गजानन वाघमारे लिहितात-
बऱ्याच काळाआधी ठरली आहे
दुनियेची बरबादी ठरली आहे
चेहऱ्यावरी तणाव प्रत्येकाच्या जणू उद्याला फाशी ठरली आहे'
आणि राहता राहिला आजचा माणूस, तर त्याला 'हेपी थॉट्स'ची प्रवचने ऐकावी लागतात. इतका तो मुळात उदास उद्विग्न झालेला आहे. आज वाघमारे हे निरीक्षण किंवा हा अनुभव लिहितात. त्यांचे शेर आपणास आधी वाचलेल्या मता-विचारांची आणि घटनां-प्रसंगांची आठवण करून देतात. पेंगणाऱ्या मेंदूला चिमटा घेतात.
खालील शेरांवर काय बोलावे?
'न मस्जिदीमधे गेलो न मंदिरात गेलो मी
स्वत:ला शोधण्यासाठी स्वत:च्या आत गेलो मी
कळप अतृप्त इच्छांचा पुढे लोटत मला होता
कुठरवर जायचे नव्हते तरीही जात गेलो मी
मला माहीतही नव्हती स्वत:ची नेमकी किंमत
कळाले फार उशिराने किती स्वस्तात गेलो मी
नशीबी कास्तकारी मज दिली माझ्या हयातीने
उभे आयुष्य घेऊनी उन्हातानात गेलो मी
उजवली लेक मी आधी अन् पुढे मी घेतली फाशी
पुरे कर्तव्य केल्याच्या समाधानात गेलो मी'
आजच्या गझलेत काव्य नाही, असा आरोप होतो. याचा उल्लेख वर आला. त्याचे उत्तर खालील शेरांमधून मिळते का बघा-
इथे कुठल्याच डोळ्यांना झरे नाही दिसत आता
जगाचे यापुढे काही खरे नाही दिसत आता
कळेना कोणता जडला आज आजार डोळ्यांना
बरे झाले कुणाचे तर बरे नाही दिसत आता
इथे डोळ्यात खोट्याने खऱ्याच्या टाकली माती
खऱ्याला त्यामुळे बहुधा खरे नाही दिसत आता'
उलट मर्ढेकरांच्या नंतर कवितेत जी एक 'आडधोंड दुर्बोधता' आली होती आणि नंतर भटांची प्रासादिक कविता रसिकांना कुठेतरी दिलासा देणारी ठरली, त्यात समन्वयाचे काम आजची गझल करते. ती छंदबद्ध असल्याने तिच्या प्रवाहीपणावर आक्षेप घेता येत नाही. दुसऱ्या अंगाने या नवीन गझलचे शेर अभिनव भाषेतून वेगळ्या शैलीतून असल्याने आपणास थांबून विचार करायला लावतात. म्हणजे अमूर्त चित्रे बघताना प्रेक्षकाची दमछाक होते आणि सुबोध चित्रे बघताना त्यावर फार काळ डोळे स्थिरावत नाहीत. मात्र त्यापलीकडे अशीही चित्रे की ती अनाकलनीयही नाहीत आणि आस्वादासाठी थांबावे लागते, विचार करायला भाग पाडते अशी आजची गझल आहे. त्यांची गझल कोणती विशिष्ट वैचारिक भूमिका घेऊन किंवा विशिष्ट मुद्रा लावून आपली ओळख उभी करण्याऐवजी समांतरपणे सर्वसमावेशी स्वरुपात बोलते. या आजच्या समन्वयी गझलच्या प्रतिनिधित्वाचे ती वहन करीत आहे. असे म्हटल्यास समकालीन मराठी गझलविषयक वास्तव क्षतिग्रस्त होणार नाही. या निमित्ताने इथे एक मत मांडणे मी आवश्यक मानतो की जे कुणी कवी आपल्या गझल संग्रहांसाठी ज्येष्ठांना प्रस्तावना किंवा मलपृष्ठावर अल्पसा परिचय (ब्लर्ब) लिहिण्याची विनंती करतात त्यांनी आपले शेर, आपल्या ओळी इतरांच्या शेरांशी लावून बघाव्यात. इथे तुलनेचा घोटाळा करू नका. कुणीच कुणासारखे लिहीत नाही आणि लिहू नये. पण त्यात "सांगण्यासारखे किंवा वाचण्या-ऐकण्यासारखे काय आहे ?" या प्रश्नाचे उत्तर काहीतरी धीटपणे देता आले पाहिजे. कारण आपणा सर्वांना म्हणजे कवी-कवयित्री, गझलच्या कार्यक्रमाचे आयोजक, आस्वादक-समीक्षक... यांना, आधीच लोकांमध्ये निर्माण झालेली गझलची आवडी सांभाळायची आहे. ती सांभाळताना गझलचे स्वरूप त्या मान्यतेला साजेसे असले पाहिजे. नाही का? वाघामारेंची गझल त्या कसोटीला उतरते. त्यासाठी निश्चित किती वर्षांपूर्वीपासून ते लिहीत असावेत. त्यांची लेखणी समकालीन समस्यांच्या मुळाला कशी हात घालते, आणि नेमके म्हणायचे ते किती सुलभतेने व्यक्त करते बघा-
जो कधी येऊ नये तो काळ आलेला
माणसांचा नेमका दुष्काळ आलेला
शासनाने खून केले कास्तकारांचे
कर्जबाजारीपणावर आळ आलेला'
अर्थव्यवस्थेतच कृषी उत्पादनाला दुय्यम स्थान दिल्यावर कर्जबाजारीपणा कसा टळणार?
कुणालाही, निदान मला तरी हेवा वाटावे असे शेर लिहिण्यासाठी ते जसे थांबलेत, तशी तयारी ठेवली तर गझलचे संग्रह (दिवाणसंबंधी बोलत नाही.) निश्चितच वाचनीय निघतील आणि येत्या पिढ्या विजा घेऊन येणाऱ्या आहेत हा भटांचा विश्वास सार्थकी लागेल अशी आशा करून थांबतो.
( गजानन वाघमारे यांच्या 'भुकेचा केंद्रबिंदू ' ह्या गझल संग्रहाची प्रस्तावना )
..............................................

No comments:
Post a Comment