गझलेतील शब्दविवेक : डॉ. स्नेहल कुलकर्णी





गझलेत समर्पक शब्दनिवडीला व शब्दविवेकाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. शेरातील खयालाच्या समग्र आकलनासाठी 'समर्पक शब्दनिवड' हा एक महत्त्वाचा निकष ठरतो. शब्दांचा वैशिष्ट्य व सौंदर्यासह वापर करून त्यांना रसिकांसमोर ठेवणारा गझलकार पसंतीची पावती मिळवतो. गझलेचा पाया, गझलेचा स्थायीभावच संवाद साधणे.. हा आहे. कमीत कमी शब्दांत अधिकाधिक परिणामकारक आशय व्यक्त करणे हा शेराचा धर्म आहे आणि या धर्माची पूर्तता होण्यासाठी शेरातील प्रत्येक शब्द खयालाची उंची, लांबी, खोली जास्तीत जास्त विस्तृत करणारा, खयाल बळकट करणारा असावा. 'नेमका' शब्द निवडून तो योग्य जागी ठेवल्यामुळे त्या शब्दाला, खयालाला व एकंदरीतच शेराला वेगळे सामर्थ्य प्राप्त होते. शब्दाबरोबर शेराचेही वजन वाढते. खयाल आणि रसिक याच्यामधील सगळे अडथळे, hurdles दूर होतात, आशय आणि रसिक एकमेकांना भिडतात. अशा समर्पक शब्दांच्या शोधात खरा गझलकार अस्वस्थ असतो. आपल्या अस्सल खयालाच्या सूक्ष्मतर छटा समर्पक शब्दांनीच अभिव्यक्त होऊ शकतात ह्याची त्याला जाणीव असते. शेरातील प्रत्येक शब्दाभोवती अनेक अर्थवलये असतात. एक शब्द दुसऱ्या शब्दाच्या सहवासात आला की त्याच्या मूळ अर्थाहून वेगळा अर्थ सूचित करतो, परस्परांना नवे संदर्भ प्रदान करतो आणि त्याद्वारे गझलकाराची अभिव्यक्ती अधिक गहिरी करतो. त्यामुळे शेरातील प्रत्येक शब्दाच्या स्वतंत्र अर्थापेक्षा त्यातील सर्व शब्दांचा एकत्रित अर्थ जास्त परिणामकारक ठरतो. त्यादृष्टीनेही अचूक शब्दनिवडीला वेगळे महत्त्व प्राप्त होते. असा शब्द एकाच वेळी वेगवेगळ्या रसिकांशी विभिन्न पातळीवर संवाद साधू शकतो मग व्यक्तीपरत्वे एकाच शेराचे अर्थ बदलत जातात आणि त्या शेराला अनेकार्थक्षमता प्राप्त होते जे शेराचे व्यवच्छेदक लक्षण आहे. खयाल ही एकंदरीत अमूर्त गोष्ट असली तरी.. तो प्रस्थापित करणारा प्रत्येक शब्द शेराचा प्राण आहे. असे सजीव शब्द घेऊन येणारे शेर रसिकाला आपल्या आंतरिक विश्वाचे पडसाद वाटू लागतात, आपल्याच काळजाचे आलाप वाटू शकतात. असे शेर सर्वसामान्य लोकांच्यातही म्हणी किंवा वाक्प्रचारांच्या रूपाने प्रसिद्ध होतात. आ. सुरेश भटांच्या अनेक शेरांनी अशी जादू केलेली आहे.


'इतकेच मला जाताना सरणावर कळले होते 

मरणाने केली सुटका जगण्याने छळले होते'


हा त्यातील एक.


शब्दांवर आंधळे प्रेम करून, आपल्याला आवडणारा, भुलवणारा अनावश्यक शब्द निवडल्यास तो शब्द शेरावर कुरघोडी करतो. अशा वेळी शब्द हातातून निसटतात व स्वैरपणे जागा मिळेल तिथे बसतात व शेर दुर्बोध करतात.

*शब्दावरचे प्रेम आशयावरची पकड ढिली करते*.

मग 'अनेकार्थक्षमता' हा शेराचा उत्कट गुणही शेरासह अडचणीत येतो. लिखाणाच्या मूळ हेतूला बाधा निर्माण करतो. म्हणून शब्दमोह टाळणे आवश्यक असते.त्यासाठी काही मुद्द्यांवर लक्ष केंद्रित करणे गरजेचे आहे.


१) *खयालानुसार शब्दनिवड* -


एखादे दृश्य एकाच दृष्टिक्षेपात सगळेच्या सगळे डोळ्यांत मावावे तसे वाचल्यानंतर किंवा ऐकल्यानंतर शेराचे एकंदरीत भावरूप मनात सामावायला हवे. यासाठी खयालाच्या मागणीनुसार शब्द निवडले गेले पाहिजेत. शब्दरूप आणि भावाशय यात अंतर पडता कामा नये. आशय आणि विषय यात घोटाळा होता कामा नये. खयालाचा आशय हा गझलकाराच्या अंतरंगातून येतो. तो तिथेच जन्मतो. जाणिवांनी,

संवेदनांनी संपन्न होतो. तिथे त्याचे रूप अबोध अवस्थेत असते. हा खयाल जेव्हा कागदावर शेराच्या रूपाने मूर्त स्वरूपात येणार आहे तेव्हा तो जसा अंतरंगात जन्मला आहे त्याच्या जास्तीत जास्त जवळ  जाणारा चेहरा शब्दांनी त्याला द्यायला हवा.उगीच क्लिष्टरचना करत शब्दांच्या कोलांट्या मारत श्रोत्यांना संभ्रमित करू नये. काय सांगायचे ते प्रांजळपणे सांगावे. अर्थ शोधण्यासाठी त्याचे उत्खनन करावे लागू नये. खयालानुसार शब्द इतके अपरिहार्यपणे आले पाहिजेत की काही सांगायचं राहून गेलंय किंवा यापेक्षा अधिक सांगता आले असते असं वाटायला नको. तरच शब्दाच्या माध्यमातून होणारी गझलकाराची अभिव्यक्ती परिपूर्ण ठरेल. त्यालाच आपण 'शेराची बांधणी' म्हणतो. यशस्वी ठरलेली शेराची बांधणी गझलकाराला आणि सहृदय रसिकालाही संपूर्ण समाधानाची भावना देते. योजलेल्या शब्दामागे जिवंत अनुभव असेल तर शेराला आणखीनच समृद्धी प्राप्त होते.

आ. सुरेश भटांचा हा शेर पहा -


'अद्यापही सुऱ्याला माझा सराव नाही

अद्यापही पुरेसा हा खोल घाव नाही'


वेदनेच्या उगमाचे कारण बनून आलेला प्रतिकात्मक सुरा आणि त्या सुऱ्याने केलेला घाव. इथे या दोहोंच्या एकत्रीकरणातून दुःखाची खोली, व्याप्ती वाढलीय. सुऱ्याने केलेली जखम, व्रण वगैरे शब्द न वापरता, घाव हा योजलेला शब्द अर्थाचे, दुःखाचे एक वेगळे वलय सोबत घेऊन येतो आणि खयाल अभिव्यक्तीची परिसीमा गाठतो. शब्द तोच.. पण योग्य जागी, योग्य साहचर्यासोबत वापरल्यामुळे त्याच्यात नवीन उर्मी भरली जाते जी खयालाची व्याप्ती वाढवते.


२) *अर्थच्छटेनुसार समानार्थी शब्दाचा वापर* -


वृत्तपूर्तीसाठी काही वेळा खयालाच्या मागणीनुसार चपखल असणारा शब्द सोडून त्याला समानार्थक असणारा शब्द शेरात योजला जातो. पण दोन समानार्थी शब्द परस्परांचे पूर्णार्थाने कधीच पर्याय असू शकत नाहीत. खोलवर विचार केल्यास त्या दोन शब्दांमधील वेगळेपण स्पष्टपणे जाणवते. त्यामुळे त्यांच्या अर्थातील फरक खयालातील हेतूला बाधा पोहोचवत नाहीत ना... याची कटाक्षाने काळजी घ्यायला हवी. मराठी ही अतिशय समृद्ध भाषा असून तिचा प्रत्येक समानार्थी शब्द वेगळी अर्थछटा घेऊन येतो. अगदी समान संवेदना घेऊन येणारे शब्द सुद्धा वेगवेगळे भावनिक अर्थ मांडतात. अगदी इतर सर्व बाबींकडे दुर्लक्ष करून शेराचा आशय आणि अभिव्यक्ती ह्या दोनच मुद्द्यांचा विचार केला तरीही खयालाची अतिसूक्ष्म छटा उजागर करण्यासाठी चपखल शब्दाचा एक आणि एकमेव पर्याय असतो. त्यामुळे वृत्तमागणीसारख्या अडचणीतूनही मार्ग काढत गझलकार जेव्हा 'नेमक्या' शब्दाची निवड करतो तेव्हा तो शेर 'लक्षणीय' ठरतो. एका अस्सल गझलकाराच्या शेरातील शब्दांना पर्याय नसतात.. हेच त्याच्या प्रतिभेचे आणि गझलेचेही यश असते.


आ. सुरेश भट यांचे हे दोन शेर पहा -


१)मी खरे बोलून जेव्हा पाहिले

हा टळाया.. तो पळाया लागला


२)व्हावे निरभ्र सारे सांगून एकदा

कोणी असे स्मितांच्या मागे दडू नये


इथे सांगून आणि बोलून हे दोन वरकरणी समानार्थक शब्द आहेत. मग आ. भटांनी दोन्हीकडे त्यापैकी एकच किंवा पहिल्या शेरात सांगून दुसऱ्यात बोलून असा शब्द का वापरला नसावा?

विचारांती असे वाटते की सांगून, बोलून हे दोन्ही शब्द सामान्यत: समान अर्थाचे असले तरी त्यात वृत्तिभेद आहे. बोलणे मधे त्या दोन व्यक्तीमधील जवळीक, आत्मीयता व त्यातून होणारे हितगुज अपेक्षित आहे. हे प्रेमातून, विश्वासातून आलेले 'बोलणे' आहे, 'सांगणे' नाही. सांगणे.. त्रयस्थ व्यक्तीसारखे. थोडेसे अलिप्ततेतून आलेले. स्वतःचे वेगळे आस्तित्व राखून ठेवणारे. इथे पहिल्या शेरात जवळच्या व्यक्तीशी बोलून पाहणे.. हा भाव जास्त गडद असणे अपेक्षित आहे. हा टळाया तो पळाया लागला... यातून जवळच्या व्यक्तीचे दूर जाणे अभिव्यक्त होते, जे जास्त दुखावणारे आहे. त्या अनुषंगाने बोलून.. हा शब्द योजला असावा. दुसऱ्या शेरात केवळ मनातील सगळे रिक्त करणे आणि निरभ्र होणे... तसे सुतोवाच अपेक्षित आहे. इथे समोरचा कुणीही असू दे... तुमच्या मनाला गिळंकृत करणारा काळा मेघ रिता होणं, हा भाव जास्त गडद होणं महत्त्वाचे. जी खयालाची मागणी आहे. त्यासाठी आ.सुरेश भटांनी सांगून... हा शब्द योजला असावा. अशी एक विचारधारा संभवते.


आत्यंतिक भावाभिव्यक्तीसाठी समानार्थी शब्दांची अशी अचूक निवड यथोचित, महत्त्वाची ठरते.


३) *प्रमाण शब्दांचा वापर* -


प्रमाणभाषा म्हणजे शासनाने, समाजाने दैनंदिन व्यवहारासाठी ठरविलेली भाषा... त्यामुळे ती भाषा कुण्या एका समाजाची किंवा शहराची नसते. आणि 

 मराठी भाषा जिथे जिथे बोलली जाते तिथे तिथे जो शब्द बोलला जातो, लिहिला जातो किंवा त्याचा अर्थ बहुतांशी मराठी लोकांना माहिती आहे तो शब्द म्हणजे  प्रमाण शब्द. शेरात असे प्रमाण शब्द असतील तर तो विनासायास सर्वदूर पोहोचेल, सर्वसामान्य रसिकांपर्यंत पोहोचेल. त्यांना समजेल, त्यांना आपलेसं करेल.

काही टिपिकल वऱ्हाडी, कोकणी.. शब्दांचा अर्थ जसा खानदेशातील वा विदर्भातील सर्वसामान्य व्यक्तीला माहिती असेलच असे नाही. तसेच काही प्रादेशिक, त्या त्या भागापुरता बोलला जाणारा बोलीभाषेतील शब्द प्रत्येक मराठी माणसाला माहिती असेलच असे नाही. प्रमाण शब्दाच्या बाबतीत ही अडचण निर्माण होण्याची शक्यता खूप कमी असते. त्यामुळे त्या शब्दाचे स्पष्टीकरण द्यावे लागत नाही. अर्थात असा, प्रादेशिक शब्द वापरणे, न  वापरणे हे गझलकाराचे वैयक्तिक स्वातंत्र्य असते आणि त्यात चूक काहीही नाही. पण शेरातील समर्पक शब्दनिवड या अनुषंगाने हा मुद्दा महत्त्वाचा ठरतो.


४) *शब्दांचा क्रम*-


 निवडलेले शब्द वृत्तानुसार मांडतानाही त्यांचा योग्य तो स्वाभाविक, सुयोग्य क्रम जुळवणे महत्त्वाचे ठरते. आशयाला बळकट करत खयाल रसिकांपर्यंत पोहोचवणारे शब्द गझलकार व रसिक यांच्यामधला दुवा असतात. नेमक्या शब्दांबरोबर त्यांचा नेमका क्रम दोघांमधला मोकळाढाकळा हृदयसंवाद त्वरित घडवून आणणारा जवळचा, खुष्कीचा मार्ग असतो.


'साध्याच माणसांचा एल्गार येत आहे

हा थोर गांडुळांचा भोंदू जमाव नाही'


त्या काळात उज्ज्वल भविष्य जाणून या शेरातून आ. सुरेश भटांनी उद्या येणाऱ्या प्रभावशाली क्रांतीचे देदीप्यमान, लखलखते चित्र डोळ्यांसमोर उभे केले. उद्याचे जग निर्माण करणारे तुम्ही आम्ही आहोत हा विश्वास त्यातून निर्माण केला, निर्माण झाला.


 वृत्त सांभाळून हा शेर 


'एल्गार येत आहे.. साध्याच माणसांचा

भोंदू जमाव नाही हा थोर गांडुळांचा'


असा लिहिला गेला असता तर वरच्या शेरातून जो जोश, जो एल्गार अपेक्षित आहे.. तो चिंगारी स्वरूपात आपल्यापर्यंत पोहोचला असता का?


यासाठी शेरातील शब्दांचा क्रम आपल्याला अभिप्रेत असलेल्या खयालाच्या प्रभावानुसार योजावा.


५) *विशेषण, क्रियाविशेषण.. यांचा समर्पक वापर*-


शेरात विशेषणाचा सढळ वापर होत असतो. परंतु समर्पक आणि यथार्थ विशेषण वापरणे हे प्रगल्भ प्रतिभेचे लक्षण आहे. शेरातील विशेषणाचे नियोजन अत्यंत कल्पकतेने, सूचकतेने व्हायला हवे. नेहमी वापरली जाणारी किंवा रसिकांना पाठ असणारी विशेषणे अर्थाला फार पुढे नेऊ शकत नाहीत असं दिसतं. विशेषण, क्रियाविशेषणातून साकारलेल्या प्रतिमा विभिन्न अर्थसमावेशक बनतात, रसिकांच्या कल्पकतेला आवाहन करतात. खयालाचा भाव, त्याचा अपेक्षित रंग उत्तरोत्तर अधिक गडद करतात पण त्याचे उल्लंघन करत नाहीत हे विशेष. ती शेराला सर्वोच्च अनुभूतीचे स्थान देतात, रसिकमनावर अधिराज्य करतात. त्यामुळे गझल लिखाणात त्यांना वैशिष्ट्यपूर्ण, महत्त्वाचे स्थान आहे.


'या अशा ओसाड रानी ही फुले कोठून आली?

काय एखाद्या कवीचे रक्त येथे झरत होते?'


इथे ओसाड रान म्हणजे संवेदनाशुष्क, कोरड्या पडलेल्या भावनाशून्य मनांचा, माणसांचा समुदाय. त्यात फुललेली फुले म्हणजे स्वतःचे आयुष्य पणाला लावून कवीने रचलेले काव्य..!! इथे ओसाड रान ही प्रतिमा, ओसाड हे विशेषण. ओसाड.. ज्यात काहीही उगवू शकत नाही, रुजू शकत नाही अशी निष्प्राण मोकळी जागा आणि त्यात स्वतःचे काव्य, स्वतःचे रक्त, स्वतःचे प्राण पाझरणारा कवी...!आ. सुरेश भट...त्या दोन शब्दांमधून चिरंतन स्त्रवणारी भकास वेदना रसिकांसमोर चिंतनासाठी उभी करतात आणि आपण त्या शब्दांपुढे नतमस्तक होतो.


थकून गेलो तरी फुलांचा सुरूच हेका

'अजून गा रे... अजून गा रे... अजून काही..'


इथेही आ. सुरेश भटांनी वापरलेले अजून.. हे क्रियाविशेषण आणि त्याची केलेली आवृत्ती रसिकमनाला तात्काळ एका उत्कटावस्थेत नेऊन सोडते. एकाच वेळी स्वप्नील पण काहीतरी सलणारा हा प्रदेश आपल्याला घेरून टाकतो. फुलांच्या मंद सुगंधात जीव गुदमरून टाकणारा आभास... इतकी परस्परविरोधी अजब दुनिया अनुभवायला ते आपल्याला भाग पाडतात... !!कोवळ्या मनाची मागणी आणि अतृप्तीची वेदना.. हे परस्परविरोधी हृदयस्पर्शी भाव एकाच बिंदूवर तोलणारा हा शेर.... जगण्याच्या, जीवनाच्या सगळ्या छटा किती मोजक्या शब्दांत अधोरेखित करतो. ही शब्दांची अद्भुत किमया...!!


६) *शब्दांची प्रासादिकता* -


गझल ही नजाकत असलेली, तरल विधा आहे. कोणत्याही भावनेची, विचारधारेची पराकोटीची तीव्र अवस्था संयमाने व्यक्त करणे ही तिची खासियत आहे. हा गझलस्वभाव पाहता खयाल अभिव्यक्तीसाठी निवडलेले शब्द सभ्य, संसदीय, निर्मळ - प्रासादिक असावेत. प्रासादिक शब्दांतून विवेक प्रगट होत असल्याने त्याच्या वाचनाने, श्रवणाने मनात प्रेम, पूज्यभाव, सकारात्मकता निर्माण होते... मग तो शेर कोणत्याही विषयावर बेतलेला असला तरीही...! त्यातून ज्ञान प्राप्त होते, सद्बुद्धी जागृत होते. अहंकार नाहीसा होऊन आत्मबुद्धी प्रकट होते. जी मनातील जीवनमूल्ये जागृत करते, सोसण्याचे बळ वाढवते. प्रासादिकतेमुळे शेराचे स्वरूपही सोपे होते. तत्कालीन सामाजिक, कौटुंबिक, राजकीय, सांस्कृतिक परिस्थितीचे चित्रण करण्यासाठी गझल हे अभिव्यक्तीचे सशक्त माध्यम मानले जात आहे. अशा परिस्थितीत प्रेम, विरहाबरोबरच बंडखोरी करणारे शेर पुढे येत आहेत, जे साहजिक आहे. पण रागही प्रेमाने व्यक्त केला तर तो जास्त प्रभावी ठरतो.. हे आजवर गझलेने दाखवून दिलेले आहे. आपली वैयक्तिक, सामाजिक, भौतिक, आध्यात्मिक चीड व्यक्त करण्यासाठी गझलेचा शस्त्र म्हणून वापर होऊ नये.. हे मात्र निश्चित!!


मी जरी आजन्म येथे वेचले काटे

ही फुले माझी, असेही वाटले होते


घाव तू केलेस, झाल्या धन्य माझ्या यातना

काय मी मागू? मला आधीच सारे लाभले 


एकदा केव्हातरी मी वचन कवितेला दिले

राखरांगोळीस माझ्या गुणगुणावे लागले


स्वतःचे दुःख विरोधाचा एकही सूर न लावता, जेव्हा शेरात असं सजवून मांडलं जातं तेव्हा ते रसिकाचे काळीज जास्त व्याकूळ करतं...!!! आ. सुरेश भटांच्या वरील शेरांनी दिलेला हा धडधडीत पुरावा आहे.


एकंदरीतच आ. सुरेश भट यांच्या वाट्याला आलेली साहित्यिक, वैयक्तिक उपेक्षा आणि तत्कालीन चुकीच्या सामाजिक, राजकीय परिस्थितीची त्यांना असणारी भयंकर चीड, गझलेविषयी साहित्यिकांत असलेले औदासीन्य..यातून त्यांच्या काही शेरात शब्दांचा तीव्र, आक्रमक सूर लागलेला दिसून येतो. पण तो अपवादात्मक मानावा इतका. एरवी मनातील विद्रोहही सालंकृत करणारे आ. सुरेश भट म्हणतात -


ही दुनिया पाषाणाची बोलून बदलली नाही

मी बहर इथे शब्दांचे नुसतेच उधळले होते

 

.. असा शब्दांचा बहर गझलेतून आपणही उधळू या !!!

.......…..........................…......

डॉ. स्नेहल कुलकर्णी,

गारगोटी,

9922599117

No comments:

Post a Comment