तीन गझला : प्रियंका गिरी

 




१.


वाहते पाणी निरंतर काठ ओला होत जातो

त्याच काठावर कुणाचा जीव हळवा होत जातो


आठवण येताच घेते डायरी अन् पेन हाती

अंतरामधला उन्हाळा पावसाळा होत जातो


वाचताना पत्र त्याचे मी मधे थांबून जाते

शेवटी मजकूर इतका जीवघेणा होत जातो


पाहतो माझ्याकडे अन् दोर तो फेकून देतो

केवढा प्रेमात कणखर बाप माझा होत जातो


एवढ्यासाठीच गझले मी तुझ्या स्वाधीन होते

एकट्या पडतात जखमा कोंडमारा होत जातो


२.


तुझ्या डोळ्यांमधे शोधायचे आहे 

स्वतःला एकदा भेटायचे आहे


नजर वळवायची आहे जमावाची 

नवे पिल्लू अता सोडायचे आहे


नदी पाहून वेडा जीव पुटपुटला 

मलाही दूर वाहत जायचे आहे 


स्वतःला जो कधी बदलू शकत नाही 

म्हणाला जग मला बदलायचे आहे 


दिले आहेस तू गोंदण मनावरती 

मला आजन्म ते मिरवायचे आहे


दिव्याला रात्रभर जागायचे आहे 

कळेना कोठवर सोसायचे आहे


युगांपासून हे जग धावते आहे 

कुठे त्याला बरे पोचायचे आहे 


३.


निवांत वेळी आवरल्यावर भेटू आपण

सूर्य जरासा मावळल्यावर भेटू आपण


भेटायाचो तिथे अताशा गर्दी असते

गर्दी थोडी ओसरल्यावर भेटू आपण


तुझी गुलाबी पत्रे आता हरवलीत रे

शोधुन बघते, सापडल्यावर भेटू आपण


सोबत भिजणे, मनात होते..राहुन गेले

सर एखादी कोसळल्यावर भेटू आपण


तुझ्यासारखी अजून मीही तरूण आहे

शंकेचे हे वय टळल्यावर भेटू आपण


जुने बहाणे जुने स्पर्श अन् जुने तराणे

जुने शहारे आठवल्यावर भेटू आपण


तुझ्याचसाठी जपून ठेविन श्वास शेवटी

अखेरच्या त्या उंबरठ्यावर भेटू आपण

..............................................

No comments:

Post a Comment