दोन गझला : गिरीश खोब्रागडे

 




१.


पराभव अटळ आज युद्धात माझा

जवळचाच व्यक्ती करे घात माझा


किती लोक वाईट झाली म्हणावी

दिले बोट तर ओढती हात माझा


विसरलो तिचा चेहरा मी कधीचा

तिला चेहरा मात्र लक्षात माझा


खरे बोलण्याचा जसा यत्न केला

तसा खून केलात चौकात माझा


सवय जात नाहीच वरचढपणाची 

जरी मारला मी इगो आत माझा

                               

२.


तू दिला प्रत्येक सल्ला जीवनाला सार्थ होता 

मीच तेव्हा काढलेला वेगळा व्यंगार्थ होता 


खंत थोडीही कशी ना, वाटली कोणास याची 

की अपेक्षित लेखकाला कोणता मतितार्थ होता 


आज तू बघतेस ज्यांना ते तथागत बुद्ध आहे 

भूतकाळाचा कुठे तो, राहिला सिद्धार्थ होता 


का अचानक वेळ आली, वाममार्गी जायची मग 

योग्य मार्गाने मिळवला जर इथे चरितार्थ होता 


धर्मभोळे लोक केले धर्मबेरूंनी नव्याने 

काय त्यांच्या हाच लेखी शेवटी परमार्थ होता                      

..............................................

No comments:

Post a Comment